आर्थिक सर्वेक्षणानुसार (Economic Survey 2022) दूरसंचार (Telecom) क्षेत्रात सुधारणा घडून आणण्यासाठी सरकार विशेष लक्ष देत आहे. जर दूरसंचार क्षेत्र सुधारल्यास 4G नेटवर्कला चालना मिळेल आणि 5G नेटवर्कसाठीही अनुकूल वातावरण तयार होईल. गेल्या दोन वर्षांपासून भारत कोरोना संकटाशी लढा देत आहे. 2021-22 आर्थिक सर्वेक्षणानुसार या दोन वर्षांत ऑनलाईन काम करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अनेक कंपन्यांतील कर्मचारी वर्क फ्रॉम होम (Work From Home) करत आहेत. त्यामुळे आजच्या काळात डेटाचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतोय. दूरसंचार क्षेत्रात सुधारणा झाल्यास ब्रॉडबँड, दूरसंचार कनेक्टिव्हिटीला प्रोत्साहन मिळेल. भारतीय दूरसंचार क्षेत्राच्या प्रगतीसाठी अनेक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आल्याचा दावा या आर्थिक सर्वेक्षणात करण्यात आला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात टेलीकॉम क्षेत्राला सुगीचे दिवस येण्याची शक्यता आहे
देशाच्या सर्वांगिन विकासाठी दूरसंचार क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावत आहे. गेल्या काही वर्षांत दूरसंचार क्षेत्राचं महत्त्व प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. कोरोना काळात दूरसंचार ग्राहकांची संख्या, इंटरनेट ग्राहकांची वाढती संख्या आणि ब्रॉडबँड कनेक्शनची मागणी झपाट्याने वाढली आहे. यावरुन दूरसंचार क्षेत्राची व्याप्ती समजू शकते. भारतात गेल्या काही वर्षांमध्ये डेटाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
खासकरुन दूरसंचार क्षेत्रात कमी किंमतीत उपलब्ध असलेल्या डेटाला ग्राहकांनी पसंती मिळाली. 2017-18मध्ये वायरलेस डेटा उपभोगाची मागणी प्रति महिना सरासरी 1.24 गीगाबाइट एवढी होती. ती आता 14.1 गीगाबाइट इतकी झाली आहे. तर डिसेंबर 2021पर्यंत मोबाईल टॉवरची संख्या 6.93 लाख इतकी झाली आहे.
पुढील आर्थिक 2022-23 वर्षात भारताचा विकास दर (GDP) 8 ते 8.50 टक्के राहण्याचा अंदाज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक सर्वेक्षण अहवालात व्यक्त केला आहे. या सर्वेक्षणात महागाईचा दर आटोक्यात राहणे अपेक्षित आहे. यापुढे महामारीमुळे कुठलंही आर्थिक संकट येणार नाही, मान्सून सामान्य राहिल आणि कच्चा तेलाच्या किंमती प्रति बॅरल 70-75 असतील, या गोष्टींच्या आधारे भारताचा विकास दर जाहीर करण्यात आला आहे.
अर्थसंकल्पाचा शेअर मार्केटवर सकारात्मक परिणाम; सेन्सेक्स वधारला, निफ्टीमध्ये देखील वाढ