मुंबई – गेल्या वर्षी स्टार्टअप्स, फिनटेक कंपन्या आणि बॅंकांची भागीदारी मजबूत करण्यासाठी सरकारने अनुकूल धोरणे राबविली. त्याचा परिपाक दिसून आला. डिजिटल पेमेंट मध्ये 40 टक्क्यांची वाढ झाल्याचे रिझर्व्ह बँकेने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीत स्पष्ट झाले. ही अनुकूल परिस्थिती कायम ठेवण्याची आणि या क्षेत्राला कर सवलत देऊन प्रोत्साहन देण्याची मागणी करण्यात येत आहे. जेटा बँकिंगचे अध्यक्ष मुरली नायर यांनी सांगितले की, 2021 हे वर्ष भारतीय फिनटेक आणि स्टार्टअप कंपन्यांसाठी अभूतपूर्व आहे. 2022-23 च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात या क्षेत्रातील मोठी वाढ लक्षात घ्यावी लागेल आणि नजीकच्या भविष्यात अशा वाढीसाठी या क्षेत्राला सातत्याने प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.
कोरोना महामारीमुळे (Corona Pandemic) प्रत्येक क्षेत्रावर परिणाम झाला आहे. जगभरातील अर्थव्यवस्थेवर त्याचा प्रतिकूल परिणाम दिसून आला आहे. परंतु काही क्षेत्रासाठी आणि उद्योगांसाठी हे संकट इष्टापत्ती ठरले आहे. यामध्ये तंत्रज्ञानाचा खुबीने वापर करणाऱ्या वित्तीय संस्था, फिनटेक (Fintech) आणि नव उद्योग स्टार्टअप्स (Startup) यांनी चमकदार कामगिरी बजावली आहे. देशांतर्गत 2021 मध्ये या दोन्ही क्षेत्रांनी जोरदार मुसंडी मारली आहे. देशाचा अर्थसंकल्प सादर व्हायला आता काही दिवसांचा कालावधी उरला आहे. पडत्या काळात उमेदीचा झेंडा रोवणाऱ्या आणि पदार्पणातच उलाढालीचे रेकॉर्ड करणाऱ्या फिनटेक आणि स्टार्टअप्सला आता सरकारकडून या कामगिरीबद्दल शाबासकीच नाही तर कर सवलत आणि सुविधा हव्या आहेत.
भारतीय फिनटेक आणि स्टार्टअप कंपन्यांसाठी 2021 हे वर्ष अभूतपूर्व आहे. यावर्षी 40 हून अधिक स्टार्टअप्सने युनिकॉर्न दर्जा मिळविला. इतकेच नव्हे तर 2021 मध्ये या उद्योगात प्रचंड वाढ झाली. फिनटेक उद्योगामुळे डिजिटल पेमेंट क्षेत्रात भारतात मोठी वाढ झाली. यावर्षी लोकांनी देयकांसाठी मोठ्या प्रमाणात डिजिटल पद्धतींचा वापर केला. 2022-23 च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात या क्षेत्रातील मोठी वाढ लक्षात घ्यावी लागेल आणि नजीकच्या भविष्यात अशा वाढीसाठी या क्षेत्राला प्रोत्साहन कायम ठेवावे लागेल.
काय आहेत महत्वाच्या मागण्या
अर्थसंकल्पात बँका आणि फिनटेक यांच्यातील भागीदारी मजबूत करावी
डिजिटल पेमेंट क्षेत्रातील तेजी पाहता, यावेळी अर्थसंकल्पात ग्राहक, व्यापारी आणि त्यासाठी परिसंस्था बळकट करणाऱ्या लोकांना कर सवलत देण्यात यावी
सक्षम अर्थव्यवस्थेसाठी डिजिटल पेमेंट यंत्रणा सक्षम करावी लागेल
आर्थिक विकासाला गती देण्यासाठी या क्षेत्राला चालना देणे गरजेचे
पारदर्शकतेसाठी या क्षेत्राची भूमिका महत्त्वाची