पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने मंगळवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. त्यावेली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी चांगली फिरकी घेतली. केंद्रीय अर्थसंकल्पात इंटर्नशीप योजनेची घोषणा करण्यात आली. त्याकडे त्यांनी लक्ष वेधले. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने जाहीरनामा घोषीत केला होता. त्यामध्ये इंटर्नशीपविषयीची घोषणा होती. या बजेटमध्ये तीच उचलण्यात आल्याचा चिमटा चिदंबरम यांनी काढला.
काय आहे योजना
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय बजेट 2024-25 मध्ये पंतप्रधान इंटर्नशीप योजनेची घोषणा केली. त्यांतर्गत देशातील तरुणांना 5,000 रुपयांचा मासिक भत्ता देण्यात येणार आहे. या योजनेवरुन काँग्रेसने भाजपची खेचली आहे. निवडणुकीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मुख्य विरोधी पक्षाचा जाहीरनामा वाचलेला दिसतो, असा चिमटा चिदंबरम यांनी काढला.
काय होते काँग्रेसच्या जाहीरनाम्यात
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. त्यात कौशल्य विकास आणि प्रशिक्षणाचे वचन दिले होते. या योजनेतंर्गत पदवीधारक आणि पदवीकाधारक बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण देण्याची आणि प्रत्येक महिन्याला 8,500 रुपये देण्याची हमी देण्यात आली होती. काँग्रेसने या योजनेला ‘पहिली नोकरी पक्की’ असे नाव दिले होते.
माजी अर्थमंत्र्यांनी घेतली फिरकी
माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी एक्सवर एक पोस्ट केली. ‘मला हे ऐकून आनंद होत आहे की, अर्थमंत्र्यांनी लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचे लोकसभा 2024 चा जाहीरनामा वाचला आहे. मला या गोष्टीचा आनंद आहे की, काँग्रेस जाहीरनाम्यातील पान क्रमांक 30 वर जाहीर केलेली ELI केंद्र सरकारने स्वीकारली.’
I am glad to know that the Hon’ble FM has read the Congress Manifesto LS 2024 after the election results
I am happy she has virtually adopted the Employment-linked incentive (ELI) outlined on page 30 of the Congress Manifesto
I am also happy that she has introduced the…
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) July 23, 2024
‘ मला या गोष्टीचा आनंद झाला आहे की, काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील पान क्रमांक 11 वर नमूद केलेली भत्त्यासहीत प्रशिक्षण योजना सुद्धा केंद्र सरकारने स्वीकारली आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यातून अजून काही योजनांची नक्कल केली असती तर चांगले झाले असते. मी लवकरच जाहीरनाम्यातील ज्या योजना भाजपने स्वीकारल्या नाहीत, त्यांची यादी तयार करणार आहे.’, असा टोला पण माजी अर्थमंत्र्यांनी भाजपला लगावला.