नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर हे ठिकाण चांगलंच चर्चेत आलं आहे. त्यामुळे आता हे ठिकाण देशातील प्रमुख पर्यटन केंद्र म्हणून विकसित होणार आहे. गुरुवारी अर्थसंकल्पात सरकारने लक्षद्वीपच्या विकासासाठी नवीन प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली आहे. संपूर्ण बेटांवर कनेक्टिव्हिटी, पर्यटनाशी संबंधित पायाभूत सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. यामुळे येथे केवळ रोजगार वाढणार नाही तर अर्थव्यवस्थाही मजबूत होणार आहे.
लक्षद्वीपचे एकूण क्षेत्रफळ ३२ चौरस किलोमीटर आहे. लक्षद्वीप अनेक छोट्या छोट्या बेटांचा समुह आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सरकारने येथे आता जागतिक दर्जाच्या सुविधा देण्याचे ठरवले आहे. आध्यात्मिक तीर्थयात्रा देखील प्रमोट केल्या जाणार आहेत. कारण सध्या याकडे पर्यटकांचा कल वाढला आहे. काशी विश्वनाथ नंतर आता अयोध्येला जाणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अयोध्येला आता पर्यटकांना लक्षात घेऊन विकसित केले जाणार आहे.
दररोज लाखो लोकं राम मंदिरात दर्शनासाठी येत आहेत. त्यामुळे आता सरकारने सर्व प्रमुख पर्यटन केंद्रांना जागतिक स्तरावर नेण्यासाठी ब्रँड करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे येथे सुविधा आणि सेवांचा दर्जाही वाढणार आहे. यासाठी बजेटमध्ये आराखडा तयार करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
राज्यांना यासाठी विशेष कर्ज देखील दिले जाणार आहे. जे बिनव्याजी आणि दीर्घ मुदतीचे असेल. देशभरात झालेल्या G-20 बैठकीनंतर विदेशी पर्यटकांचीही तिकडे उत्सुकता वाढली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात याचा उल्लेख केला. भारताने ज्या प्रकारे आपली विविधता आणि सौंदर्य सादर केले, त्यामुळे देशी पर्यटकांबरोबरच विदेशी पर्यटकांची ये-जा वाढली आहे.
पर्यटन मंत्रालयाने 2024 या वर्षात सुमारे एक कोटी परदेशी पर्यटक आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. 2023 मध्ये सुमारे 60 लाख विदेशी पर्यटक भारतात आले होते. पंतप्रधान मोदींनी लक्षद्वीपला येण्याचे आवाहन केल्यानंतर इंटरनेटवर लक्षद्वीपबाबत लोकं सर्च करु लागले. त्यानंतर मालदीवमधील काही मंत्र्यांनी यावर आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याचा फटका त्यांना बसला. कारण मालदीवला जाणाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे.