मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण येत्या 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प (Budget 2021) सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात गरिब, होतकरु, सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळेल, अशी आशा देशभरातील जनतेची आहे. देशाची सध्याची आर्थिक स्थिती बघता अर्थमंत्री होम लोन, इन्शूरन्स आणि टॅक्सबाबत नेमका काय निर्णय घेतात? याकडे संपूर्ण जनतेचं लक्ष लागलं आहे.
केंद्र सरकार वेतन, लोन आणि हेल्थ विमा पॉलिसीमध्ये दिलासा देईल, अशी अनेकांना आशा आहे. कारण कोरोना काळात या तीनही भागांना मोठा फटका बसला आहे. आयकर कायद्याच्या 80 सी अंतर्गत सध्याच्या दीड लाख रुपयांच्या करसवलतीत वाढ करण्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. या चर्चेत सकारात्मक निर्णय झाल्यास सर्वसामान्यांन मोठा दिलासा मिळू शकतो.
सॅलरीवर फरक पडेल?
करसवलतीत वाढ केल्यास सर्वसामान्यांना चांगला फायदा होईल. तसं झाल्यास त्याला अतिरिक्त करमुक्त उत्पन्न असं म्हटलं जाईल. लॉकडाऊन काळात पगार कपातीचा मोठा फटका चाकरमान्यांना बसला. याशिवाय लॉकडाऊन काळात घरी राहावं लागण्याने अनेकांचा खर्चही वाढला. त्यामुळे या अर्थसंकल्पात (Budget 2021) केंद्र सरकार इन्कम टॅक्समध्ये सवलत देईल, अशी अनेकांना आशा आहे.
होम लोनवर काय फरक पडेल?
कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, तर अनेकांची पगारकपात झाली. अशावेळी लोकांनी खूप संघर्ष करत आपल्या घरावर घेतलेल्या होम लोनचे हप्ते भरले. यासाठी अनेकांनी नातेवाईक किंवा मित्रांकडून उसणे पैसे घेतले. आता आगामी अर्थसंकल्पात घराच्या कर्जाशी संबंधित असणाऱ्या व्याजात सरकारने बऱ्यापैकी सूट द्यावी, अशी सर्वसामान्यांची आशा आहे. अर्थतज्ज्ञांच्या मते, सरकार तसं करु शकतं. कारण सेक्शन 80 सी अंतर्गत दीड लाखापर्यंत करात सूट देता येऊ शकते.
विम्यावर काय फरक पडेल?
जर एखाद्या विम्याची सीमा एक लाखाची आहे, या एक लाखाच्या विम्यात घरातील इतर सदस्य देखील असतील तर सरकारने ही एक लाखाची सीमा वाढवावी, अशी अनेकांची इच्छा आहे. तसं केल्यास अनेक जण वीमा पॉलिसी घेतील. गेल्या वर्षी सरकारने विम्याचे पैसे हप्त्यात देण्याबाबतची परवानगी दिली होती.
कोरोना टॅक्स येणार?
केंद्र सरकारकडून आगामी अर्थसंकल्पात कोरोना टॅक्स सादर केला जाण्याची शक्यता आहे. कारण कोरोना काळात सरकारने लसीकरण, आर्थिक पॅकेज, उपचारासाठी लागणारी सामग्री यासाठी भरपूर पैसा खर्च केला. याशिवाय आरोग्य विभागातल चांगल्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी सरकारला पैशांची आवश्यकता लागेल. त्यामुळे कोरोना टॅक्सच्या माध्यमातून हा सर्व पैसा गोळा करुन आणखी जास्त चांगली सुविधा दिली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
संबंधित बातम्या :
Budget 2021 : अनेक वस्तूंवरील सीमा शुल्क घटण्याची शक्यता, कोणत्या वस्तू स्वस्त होणार?