नवी दिल्ली : सलग दोन आठवड्यांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात (SHARE MARKET UPDATE) पुन्हा तेजीचं चित्र पाहायला मिळालं. चालू आठवड्याच्या अखेरीस शेअर बाजार तेजीसह बंद झाला. आठवड्याच्या अखेरीस शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक तीन टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. वाढत्या महागाई दराचा आलेख (INFLATION RATE GRAPH) आणि परकीय गुंतवणुकदारांचा पैशाचा वाढता ओघ यामुळे शेअर बाजारात स्थिरता-अस्थिरतेचं चित्र पाहायला मिळालं. नीच्चांकी पातळीवर पोहचलेल्या शेअर बाजाराला देशांतर्गत गुंतवणुकदारांनी खरेदीमुळं तारलं. चालू आठवड्यात सर्वाधिक तेजी धातू क्षेत्रात दिसून आली. आयटी क्षेत्रातील गुंतवणुकदारांचे (IT STOCKS INVESTOR) सर्वाधिक नुकसान झाले. चालू आठवड्यात सेन्सेक्स 2.9 टक्क्यांच्या वाढीसह 1500 हून अधिक स्तरावर बंद झाला. निफ्टीत 3.06 टक्क्यांची वाढ दिसून आली. निफ्टीनं 500 अंकांचा टप्पा गाठला. चालू आठवड्यात सर्वाधिन नफ्याची भर धातू क्षेत्रातील गुंतवणुकदारांच्या खिशात पडली.
मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, चालू आठवड्यात 100 हून अधिक स्मॉलकॅप स्टॉक्स 10 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदविली गेली. अन्य स्मॉलकॅप स्टॉक्समध्ये 50 टक्के वाढ नोंदविली गेली. गुंतवणुकदारांच्या गंगाजळीत भर घालणाऱ्या सर्वाधिक वधारणीच्या शेअर्समध्ये भारत व्हेंचर्स, उत्तम शुगर मिल्स, वेलस्पन कॉर्प, ओरिएंट बेल, मंगलौर रिफायनरी, डाटामॅटिक्स ग्लोबल, जे.के.लक्ष्मी सिमेंट, चैन्नई पेट्रोलियम, होंडा इंडिया पॉवर प्रॉडक्ट्स, राष्ट्रीय केमिकल्स, आयआरबी इंफ्रा यांच्या समावेश होतो.
जागतिक आर्थिक घडामोडींचा संमिश्र परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. शेअर बाजारात आठवड्याच्या अखेरच्या दिवशी चौफेर खरेदीच चित्र दिसून आलं होतं. सेन्सेक्स व निफ्टी मध्ये मोठी तेजी नोंदविली गेली. सेन्सेक्स 1500 हून अधिक अंकाच्या वाढीसह बंद झाला. निफ्टीनं 16250 अंकांचा टप्पा पार केला. निफ्टी वर बँक आणि फायनान्शियल निर्देशांक 2.5 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदविली गेली. मेटल निर्देशांकात 4 टक्क्यांहून अधिक तेजी दिसून आली. फार्मा, एफएमसीजी आणि रिअल्टी शेअर्समध्ये सर्वाधिक खरेदीचा जोर राहिला. सेन्सेक्स 1534 अंकांच्या तेजीसह 54,326.39 च्या स्तरावर बंद झाला. निफ्टी 457 अंकांच्या वाढीसह 16266 च्या टप्प्यावर पोहोचला. सेन्सेक्स वरील 30 पैकी सर्व 30 शेअर्समध्ये तेजी नोंदविली गेली होती.