न्यूयॉर्क : भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांना रोज नवनवीन धक्के बसत आहे. आता अदानी एंटरप्राइजेसला (Adani Enterprises) ला अमेरिकन शेअर बाजार Dow Jones मध्ये मोठा झटका बसला आहे. Dow Jones ने S&P इंडेक्समधून अदानी एंटरप्राइजेसला हटवले आहे. Dow Jones न्यूयॉर्क शेअर बाजाराला ही माहिती दिली आहे. Dow Jones च्या या निर्णयानंतर भारतात अदानी एंटरप्राइजेसच्या शेअरला लोअर सर्किट लागला. या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. अदानी पॉवरचा शेअरसुद्धा लोअर सर्किटवर आला आहे. अदानी पोर्टमध्ये 10% घसरण झाली आहे.
अदानी ग्रीन एनर्जी व अदानी टोटल गॅसचा शेअरही लोअर सर्किटवर आला आहे. यूएस स्टॉक एक्स्चेंजने अदानी एंटरप्रायझेसला S&P डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी इंडेक्समधून काढून टाकण्याची घोषणा केली आहे. या स्टॉक एक्स्चेंजच्या निवेदनात म्हटले आहे की , S&P डाऊ जोन्स निर्देशांकातून Adani Enterprises 7 फेब्रुवारी 2023 पासून Dow Jones सस्टेनेबिलिटी इंडेक्समधून काढण्यात येणार आहे.
NSEचा मोठा निर्णय
अदानी ग्रुपच्या शेअर्समधील प्रचंड चढउतार रोखण्याच्या उद्देशाने NSE ने मोठा निर्णय घेतला आहे. NSE ने अदानी पोर्टच्या F&O स्टॉक खरेदीवर बंदी घातली आहे. अदानी पोर्ट आणि एंटरप्रायझेसवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.
का होतोय परिणाम
अमेरिकेतील नावाजलेली गुंतवणूक संशोधन संस्था हिंडनबर्गच्या (Hindenburg) एका अहवालाचा फटका गौतम अदानी (Gautam Adani) यांना बसला आहे. या अहवालात अदानी समूहावर गंभीर आरोप करण्यात आले आहे. त्यानुसार, समूहाने शेअर्समध्ये फेरपार केली आणि लेखा परिक्षणात गडबडीचा आरोप करण्यात आला आहे. अर्थात या अहवालाने अदानी समूहाची चिंता वाढवली. अदानी समूहाने अहवालातील आरोप फेटाळले आणि कायदेशीर कार्यवाहीची तयारी सुरु केली. पण तोपर्यंत या अहवालाने अदानी यांचे मोठे नुकसान केले आहे. फोर्ब्स बिलेनियर्स इंडेक्स (Forbes Billionaires Index) नुसार, अदानी यांच्या संपत्तीत गेल्या 24 तासात 17.38 टक्क्यांची घसरण झाली.
एफपीओ घेतला माघारी
बाजारात काही दिवसांपासून अदानी एंटरप्राईजेसच्या (Adani Enterprises) एफपीओची चर्चा होती. हिंडनबर्ग अहवालानंतरही अदानी एंटरप्राईजसने एफपीओ (FPO) बाजारात उतरवला होता. 31 जानेवारी 2023 पर्यंत त्याची मुदत होती. याकाळात गुंतवणूकदारांनी त्याला प्रतिसाद ही दिला. कंपनीने 20,000 कोटी रुपयांचा एफपीओ आणला होता. या एफपीओचे सब्सक्रिप्शन झाल्यानंतरही कंपनीने तो रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. गुंतवणूकदारांचे (Investors) आर्थिक नुकसान टाळण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला.