मुंबई : अमेरिकेतून हिंडेनबर्ग नावाचे वादळ येते अन् भारतात गौतम अदानींचे संपूर्ण साम्राज्य हादरून जाते. संसदेपासून शेअर मार्केटपर्यंत फक्त अदानींचीच चर्चा होत आहे. 10 दिवसांपूर्वी गौतम अदानी हे जगातील चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. आता 21 व्या क्रमांकावर गेले आहे. त्यांच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे. हिंडेनबर्गच्या धक्क्यानंतर अदानी समूहाचे शेअर्स सतत घसरत आहेत. गेल्या 10 दिवसांत अदानी यांना सुमारे 9 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. शुक्रवारी गौतम अदानी यांच्यांसाठी एकापाठोपाठ नऊ Bad News आल्या. त्यानंतर एका Good News ने अदानी यांना सावरले.
1. अदानी प्रकरणावरुन शुक्रवारी संसद ठप्प झाली. विरोधकांनी संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्याची मागणी लावून धरली. तोपर्यंत संसद चालणार नाही, यावर विरोधक ठाम आहेत.
2 शुक्रवारी सकाळी अमेरिकेच्या स्टॉक एक्सचेंज डाऊ जोन्सकडून मोठा फटका बसला. डाऊ जोन्सच्या सस्टेनेबिलिटी इंडेक्समधून अदानी एंटरप्रायझेस वगळण्यात आले. त्यानंतर अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये 35% पर्यंत घसरण झाली.
3 हिंडनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये जोरदार घसरण सुरू आहे. अदानी एंटरप्रायझेसचा शेअर 24 जानेवारीला 3,442 रुपये होता, तो 3 फेब्रुवारीला 1,530 रुपयांवर घसरला. अदानी ट्रान्समिशनचा शेअर 24 जानेवारीला 2,762 रुपये होता, तो 3 फेब्रुवारीला 1,396 रुपयांवर आला. म्हणजे 50 टक्क्यांनी घसरला. अदानी पोर्ट्सचे शेअर्स 24 जानेवारीच्या 751 रुपयांच्या तुलनेत शुक्रवारी 488 रुपयांवर बंद झाला.
4 एसबीआयसह देशातील अनेक बँकांनी अदानी समूहाच्या कंपन्यांना 81,200 कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. SBI ने RBI ला अदानी ग्रुपला 23000 कोटी रुपयांचे कर्ज दिल्याचे सांगितले आहे. त्याचवेळी पंजाब नॅशनल बँकेने अदानी समूहाला 7 हजार कोटींचे कर्ज दिल्याचे सांगितले आहे. आरबीआयने देशातील सर्व बँकांकडून अदानी समूहाला दिलेल्या कर्ज आणि गुंतवणुकीचा तपशील मागवला आहे.
5 LIC ने 36,474.78 कोटी रुपये अदानी समूहाच्या बाँड्स आणि इक्विटीमध्ये गुंतवले आहेत. हिंडेनबर्गच्या अहवालापूर्वी, या गुंतवणुकीचे मूल्य दुप्पट म्हणजे 77000 कोटी रुपये होते.
6 हिंडेनबर्गच्या अहवालाने जगातील अब्जाधीशांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलेल्या गौतम अदानी यांना 21 व्या क्रमांकावर आले आहे.
7 एनएसईने अदानी समूहाचे तीन शेअर्स अल्प मुदतीसाठी एडिशनल सर्विलांस मेजर्स (ASM) ठेवले आहेत. यामध्ये अदानी पोर्ट, अदानी एंटरप्रायझेस आणि अंबुजा सिमेंट यांचा समावेश आहे. ASM ही देखरेखीची एक पद्धत आहे, ज्याद्वारे बाजार नियामक सेबी आणि मार्केट एक्सचेंज BSE, NSE यावर लक्ष ठेवतात.
8 रेटिंग एजन्सी मूडीजनेही अदानी समूहाच्या कॅश फ्लोचे मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला.
9 बांगलादेश सरकारने ऊर्जा क्षेत्रातील अदानी समूहासोबतच्या करारात सुधारणा करण्याची मागणी केली आहे. बांगलादेश पॉवर डेव्हलपमेंट बोर्डाने गुरुवारी अदानी पॉवरला पत्र लिहिले. यामध्ये वीज खरेदीचे दर बदलण्याची मागणी करण्यात आली आहे.
आता पाहूया कोणती होती ती बातमी
एकामागून एक वाईट बातम्या आल्या. त्यामुळे शुक्रवारी Adani Enterprises चा शेअर 35 टक्के घसरला. अदानी एंटरप्रायझेसचा शेअर 24 जानेवारीला 3,442 रुपये होता तो शुक्रवारी 3 फेब्रवारी रोजी 1,017 रुपयांवर आला होता. परंतु एका चांगल्या बातमीनंतर तो शेअर पुन्हा 50 टक्के वधारत 1586 वर बंद झाला.
अदानी समूहासाठी चांगली बातमी फिच रेटिंगकडून आली. फिच रेटिंग एजन्सीचे म्हणणे आहे की अदानी समूहाच्या कंपन्यांच्या किंवा सिक्युरिटीजच्या रेटिंगवर सध्या कोणताही परिणाम होणार नाही. अदानी समूहाच्या रोख प्रवाहाच्या अंदाजात कोणताही मोठा बदल होणार नाही, असे फिच रेटिंगने स्पष्ट केले. त्यानंतर अदानी समूहाच्या शेअर्सचा ट्रेंड बदलला.