नवी दिल्ली : अदानी टोटल गॅस लिमिटेड (एटीजीएल)ने सीएनजीचे दर 8.13 रुपये प्रति किलोग्रॅमने कमी केले आहेत. तसेच पीएनजीच्या किंमतीतही 5.6 रुपये प्रति घन सेंटीमीटरने घटवले आहेत. त्यामुळे ग्राहकांना स्वस्तात सीएनजी, पीएनजी मिळणार आहे. हे नवे दर आज 8 एप्रिल 2023 रोजी रात्री 12 वाजल्यापासून लागू होणार आहेत. केंद्र सरकारने डोमेस्टिक गॅस प्रायसिंग गाईडलाइन्समध्ये मोठा बदल केला आहे. त्यानंतर केंद्र सरकारने गुरुवारी सीलिंग प्राइस लावलं आहे. त्यामुळे सीएनजी आणि पीएनजीच्या दरात 10 टक्क्याने कमी येण्याची शक्यता आहे. या बदलामुळे अदानी गॅस कंपनीने सीएनजी आणि पीएनजीचे दर कमी करून सर्वात आधी बाजी मारली आहे.
या निर्णयामुळे ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजाराने अचानक उसळी घेतल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीत 80 टक्के वाढ झाली होती. एएनआयने दिलेल्या बातमीनुसार अदानी टोटल गॅस लिमिटेडने मोठी घोषणा केली आहे. अदानी गॅस कंपनी आज रात्री 12 वाजल्यापासून सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी कपात करणार आहे. नव्या किमतीनुसार आता सीएनजी 8.13 रुपये प्रति किलोग्रॅम तर पीएनजीच्या किंमतीत 5.06 रुपये प्रति घन सेंटीमीटरची घट होणार आहे.
अदानी गॅस कंपनी देशातील काही बड्या शहरात काम करत आहे. अदानी गॅस कंपनी अहमदाबाद, वडोदरा, फरिदाबाद आणि खुर्दा येथे काम करत आहे. त्याशिवाय अदानी गॅस कंपनीचे प्रयागराज, चंदीगड, पानीपत, दमन, धारवाड, उधमसिंह नगर आणि एर्नाकुलममध्ये डिस्ट्रिब्यूशन नेटवर्क आहे. दिल्लीसहीत अन्य बड्या शहरात ही कंपनी नाहीये. मात्र, अदानी कंपनीने दरवाढ कमी केल्याने इतर खासगी आणि सरकारी कंपन्यांवरही दरवाढ कमी करण्याचा दबाव वाढणार आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सीएनजी आणि पीएनजीचे दर कमी झाले आहेत. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात 8 रुपये प्रति किलोग्रॅमने घट केली आहे. तर पीएनजीच्या दरात 5 रुपयाने प्रति युनिट कमी केली आहे. त्यामुळे मुंबईत आता सीएनजी 79 रुपये प्रति किलोने आणि पीएनजी 49 रुपये प्रति युनिटने मिळणार आहे. पूर्वलक्षी प्रभावाने काल रात्री 12 वाजल्यापासून नवे दर लागू करण्यात आले आहेत. एमजीएल, सार्वजनिक क्षेत्रातील गेल इंडियाची एक सब्सिडियरी कंपनी आहे.
दरम्यान, नव्या फॉर्म्युल्यामुळे सीएनजी आणि पीएनजीच्या दरात 10 टक्क्याने घट होणार असल्याचं केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितलं. देशांतर्गत गॅसच्या किमती आता आंतरराष्ट्रीय हब गॅसच्या जागी इंपोर्टेड क्रूडशी लिंक करण्यात आले आहे. आता देशांतर्गत गॅसची किंमत भारतीय क्रूड बास्केटच्या दराच्या 10 टक्के असेल. एवढेच नव्हे तर सीएनजी आणि पीएनजीची किंमत प्रत्येक महिन्याला निर्धारित करण्यात येणार आहे. पूर्वी वर्षातून दोनदा म्हणजे दर सहा महिन्याला किमती निर्धारित करण्यात येत होत्या.