मुंबई: क्रिकेट विश्वात सध्या आयपीएलच्या मीडिया राइट्सवर (IPL Media Rights) सर्वांच लक्ष आहे. हे मीडिया राइट्स कोणाला मिळतात, ते महत्त्वाच ठरणार आहे. यंदा अॅमेझॉन (Amazon) आणि वायकॉम 18 (Viacom 18) या दोन दिग्गज कंपन्या मीडिया राइट्स मिळवण्याच्या शर्यतीत आहेत. मीडिया राइटसच्या लिलावाच पॅटर्न यावेळी थोडा वेगळा असणार आहे. टीवी राइट्ससाठी वेगळी आणि लाइव स्ट्रीमिंगसाठी वेगळी बोली लागेल. अॅमेझॉन प्राइम सर्विससाठी, लाइव स्ट्रीमिंगच हक्त विकत घेण्याच्या शर्यतीत उतरली होती. पण आता आयपीएल मीडिया राइटसमधून अॅमेझॉन माघार घेणार अशी चर्चा आहे. असं झालं तर मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्री आणि वॉल्ट डिजनीमध्ये मुख्य स्पर्धा असेल.
12 जूनला होणाऱ्या या लिलावाची किंमत 7.7 बिलियन डॉलरपर्यंत पोहोचू शकते. द प्रिंटच्या वृत्तानुसार, जेफ बेजॉस यांची कंपनी आयपीएल मीडिया राइट्समधून माघार घेऊ शकते. अॅमेझॉनने आधीच 6 बिलियन डॉलरची गुंतवणूक केली आहे. अशावेळी फक्त ऑनलाइन स्ट्रीमिंगसाठी एवढी गुंतवणूक करण्यात अर्थ नाहीय.
अॅमेझॉनने माघार घेतली, तर त्याचा रिलायन्स, डिजनी आणि सोनी ग्रुपला फायदा होऊ शकतो. याच तीन कंपन्या स्ट्रीमिंगसाठी बोली लावतील. रिलायन्सने 2021 मध्येच या लिलावाची तयारी सुरु केली होती. मुकेश अंबानी यांनी अनेक दिग्गजांची टीम बनवली व यावर काम सुरु केलं. अॅमेझॉनचे जेफ बेजोस आणि वायकॉमचे मुकेश अंबानी ही उद्योग क्षेत्रातील दोन मोठी नाव आहेत. त्यांच्यातील स्पर्धा देखील सर्वांना माहित आहे. आता बेजोस यांची माघार अंबानी यांच्या पथ्यावर पडू शकते.
भारतीय क्रिकेट बोर्ड या लिलावातून बक्कळ पैसा कमावणार आहे. याआधी 2018 ते 2022 साठी मीडिया राइट्स दिले होते. त्यातून 16 हजार कोटीपेक्षा जास्तची कमाई झाली होती. यावेळी 50 ते 60 हजार कोटीपर्यंत बीसीसीआय कमाई करु शकते.