मुंबई : आरबीआयने दोन हजाराची नोट चलनातून हटवली आहे. आपल्याकडील नोटा बदलून घेण्यासाठी आरबीआयने देशवासियांना सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. दोन हजाराची नोट पूर्णपणे चलनातून बाहेर काढण्याची आरबीआयने पूर्ण तयारी केली आहे. त्यासंदर्भात सर्व बँकांना गाईडलाईनही जारी केल्या आहेत. आरबीआयच्या गव्हर्नरे या संदर्भात मीडियाशी संवादही साधला. मात्र, आता आरबीआय 1000 रुपयांची नोटही बाजारातून परत घेणार आहेत काय? असा सवाल केला जात आहे. त्यावरही आरबीआयच्या गव्हर्नरने खुलासा केला आहे.
आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी एक हजाराच्या नोटेबाबत मोठा खुलासा केला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये असणारा संभ्रम दूर होणार आहे. एक हजार रुपयांची नोट परत आणण्याचा आमचा कोणताही प्लान नाहीये, असं शक्तिकांत दास यांनी सांगितलं. एक हजार रुपयांची नोट पुन्हा सिस्टिममध्ये आणणार आहात का? तसे संकेत मिळत आहेत, असा सवाल त्यांना करण्यात आला होता. त्यावर हे केवळ अंदाज आहेत. आमच्यासमोर असा कोणताच प्रस्ताव नाहीये, असं त्यांनी स्पष्ट केलं.
आरबीआयने नोव्हेंबर 2016मध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करून 2 हजार रुपयांची नोट चलनात आणली होती. आता ही दोन हजाराची नोट 30 सप्टेंबरपर्यंत बँकेत डिपॉझिट करावी लागणार आहे. किंवा ही नोट बदलून घ्यावी लागणार आहे. त्याची प्रक्रिया येत्या मंगळवारपासून सुरू होणार आहे. केंद्र सरकारने 1 हजार आणि 500 च्या नोटा बंद केल्यानंतर रातोरात 10 लाख कोटी रुपये गायब झाले होते. त्यामुळे या नोटांची भरपाई करण्यासाठी 2 हजाराची नोट चलनात आणण्यात आली होती.
सिस्टिममध्ये त्या पैशांची गरज होती. सध्याच्या काळात दुसऱ्या व्हॅल्यूच्या इतर नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. 2 हजाराच्या नोटांचा उद्देशही पूर्ण झाला आहे. त्यामुळे 2018-2019मध्ये या नोटांची छपाई बंद करण्यात आली होती.
दोन हजार रुपयांची नोट बदलण्यासाठी नागरिकांकडून घाई करण्यात येत आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. दोन हजार रुपयांची नोट बदलण्यासाठी कोणतीही घाई करण्याची गरज नाही. त्यासाठी बँकेत गर्दी करण्याचीही गरज नाही. 30 सप्टेंबरपर्यंत नोट बदलायची आहे. त्यामुळे तुमच्याकडे चार महिन्यांचा अवकाश आहे. म्हणून घाई करू नका, असं आवाहन त्यांनी केलं.
2000 हजाराची नोट बंद केल्याने त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार असल्याची चर्चा आहे. या चर्चेत फारसं तथ्य नसल्याचं त्यांनी सांगितलं. 2 हजाराची नोट बंद केल्याचा अर्थव्यवस्थेवर फार परिणाम होणार नाही. अत्यंत कमी परिणाम होईल. सध्या दोन हजाराच्या एकूण करन्सीच्या 10.8 टक्के नोटाच चलनात आहेत.