गुवाहाटी : आसाममधील चहाच्या मळ्यांना चहाप्रेमी पृथ्वीवरचा स्वर्ग संबोधतात. अमृतासमान चहावर प्रेम करणाऱ्या चहा अभ्यासकांसाठी चहाच्या जगतातून नवी घडामोड समोर आली आहे. आसामधील चहाचे मळे जगप्रसिद्ध आहेत. विविध प्रतींच्या चहाला जगभरातून मागणी असते. आसामच्या चहाच्या बाजारपेठेत घडणाऱ्या घडामोडींकडे जागतिक व्यापाऱ्यांचे लक्ष लागलेले असते. आसाममध्ये पार पडलेल्या वार्षिक चहाच्या लिलावात मनोहारी गोल्ड टी (Manohari Gold tea) प्रति किलो 99, 999 रुपये विक्रमी भावाने विकला गेला आहे. गुवाहाटी चहा लिलाव केंद्राचे सचिव प्रियनुज दत्ता यांनी लिलावाविषयी अधिकृत माहिती दिली आहे. मनोहारी चहा व्यापारी व सौरभ टी ट्रेडर्स यामध्ये हा व्यवहार पार पडला.
चहाच्या इतिहासातील ‘सर्वोच्च’ बोली
भारतातील आजवरच्या चहा लिलावातील सर्वोच्च बोली किंमत ठरली आहे. मनोहारी टी इस्टेटचे मालक राजन लोहिया यांनी अशाप्रकारच्या मौल्यवान चहाची निर्मिती चहाविषयी आस्था बाळगणारे तसेच आरोग्याविषयी जागरुक असणाऱ्या व्यक्तींसाठी चहाची निर्मिती केली जाते.
‘लोकल टू ग्लोबल’ मागणी
मनोहारी चहाचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पानांऐवजी कळीपासून चहाचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे सर्वाधिक किंमत असलेला चहाची चव दीर्घकाळ रेंगाळणारी आहे. मनोहारी चहाच्या आरोग्यवर्धक गुणवैशिष्ट्यांमुळे जगभरातून मागणी प्राप्त होत असल्याचे उत्पादक व्यापाऱ्यांनी सांगितले.
‘लाख’मोलाच्या चहाची वैशिष्ट्ये
आसामचा चहा स्वाद, रंग आणि कडकपणासाठी ओळखला जातो. मनोहारी नावाप्रमाणेचं चहाला सोनेरी रंग प्राप्त होतो. अन्य चहांप्रमाणे पानांऐवजी सोनेरी रंगाच्या कळ्यांपासून चहाचे उत्पादन घेतले जाते.
चहाची रेकॉर्डब्रेक कामगिरी
दोन वर्षापूर्वी पार पडलेल्या चहाच्या लिलावात मनोहारी गोल्ड चहाला सर्वाधिक पसंती मिळाली होती. प्रति किलो पन्नास हजार रुपयांनी चहाला बोली लावण्यात आली होती. केवळ दोनच वर्षात मनोहारी चहाने लिलावात रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. चहा उत्पादकांच्या म्हणण्यानुसार, 2018मध्ये नव्या प्रकारच्या चहा उत्पादनाला सुरुवात करण्यात आली होती. जगभरातीतून दिवसागणिक प्रतिसाद वाढतोच आहे. आरोग्यवर्धक गुणधर्मामुळे मनोहारी चहा रेकॉर्डब्रेक कामगिरी करत असल्याचे मत चहा अभ्यासकांनी नोंदविले आहे.