मुंबई : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरातील सर्व खासगी दुकाने (जीवनाश्मक वस्तूंचे दुकाने वगळता) 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश राज्यशासनाने दिले आहेत. मात्र तरी त्यातून सर्व बँका तसेच रिझर्व बँक ऑफ इंडिया नियंत्रित वित्तीय संस्था (Banks and financial institutions) यांना वगळण्यात आलं आहे. राज्यशासनाने याबाबत प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केलं आहे. याशिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील आज याबाबत स्पष्टीकरणही दिलं आहे (Banks and financial institutions).
“रिझर्व बँक ऑफ इंडिया नियंत्रित स्वतंत्ररित्या कार्य करणारे प्रायमरी डिलर्स, क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि., नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया आणि रिझर्व बँक ऑफ इंडिया नियंत्रित बाजारपेठेत कार्य करणारे वित्तीय बाजारातील सहभागीदार यांना 31 मार्च पर्यंतच्या खासगी आस्थापना बंदीतून वगळण्यात आले असून या वित्तीय संस्थांचे कामकाज सुरु असणार आहे”, असं राज्य शासनाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (20 मार्च) सलग दुसऱ्या दिवशी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेला संबोधित केलं. मुंबई MMRDA भाग, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या शहरांमध्ये अन्नधान्य, दूध, वैद्यकीय सुविधा, बँक अशा जीवनावश्यक गोष्टी वगळता सर्व दुकानं बंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. सर्व कार्यालये बंद राहतील, ज्यांना शक्य त्यांनी घरातून काम करा, सरकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती आता 50 टक्क्यांवरुन 25 टक्क्यांवर आणणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले?
सध्या जगात अशी वेळ आलीय, जगण्यासाठी घरात थांबणं आवश्यक आहे. पुढचे 15-20 दिवस अत्यंत महत्वाचे आहेत. संपर्क टाळणे हे एकमेव शस्त्र आहे. मात्र आपल्या काळजीपायी अत्यंत नाईलाजाने महाराष्ट्र सरकार काही निर्णय घेत आहे. कदाचित आपल्याला रुचणार नाही. रेल्वे आणि बस मुंबई शहराच्या रक्तवाहिन्या आहेत, त्या बंद करणे सोपे आहे, परंतु पालिका, स्वच्छता, आरोग्य अशा अत्यावश्यक कर्मचारीवर्गाची गैरसोय होईल. त्यामुळे तूर्तास रेल्वे आणि बस सेवा बंद करणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
ज्या कारणामुळे आपण ट्रेन, बस आपण वापरत आहोत, ती कारणं आपण बंद केली आहेत. ऑफिस बंद झाल्याने जर लोक फिरायला जात असतील तर आम्हाला ट्रेन आणि बस बंद करावे लागतील, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.
रोहित शेट्टी यांनी दिग्दर्शित केलेला कोरोनाविषयक चित्रपट मुख्यमंत्री कार्यालय ट्वीटरवर शेअर केला, जरूर पहा. यामध्ये अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, अजय देवगण, अनिल कपूर, शिल्पा शेट्टी, रणवीर सिंग, अर्जुन कपूर, वरुण धवन, आयुषमान खुराणा, आलिया भट, विराट कोहली, सचिन तेंडुलकर यांनी योगदान दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
सध्या महाराष्ट्रात कोरोनाचे 52 रुग्ण आहेत, मात्र 5 रुग्ण आता व्हायरसमुक्त झाले आहेत. त्यांच्यावर पुढील 14 दिवस देखरेख ठेवली जाईल, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
पुढे आर्थिक संकट उद्भवेल, याचा मुकाबला कसा करायचा यावर उपाययोजना सुरु आहे. त्यावर मात करण्यासाठी अभ्यास गट नेमण्यात आले आहेत. जे कर्मचारी घरी आहेत, त्यांचा पगार मालकांनी कापू नये, माणुसकी टिकवण्याची वेळ आहे, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली.
ही फिरण्याची सुट्टी नाही, सर्वांनी घरी बसून काळजी घ्यावी. काही लढाया रणांगणात लढाव्या लागतात, आपण घरात बसून या लढाईवर विजय मिळवायचा आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
संबंधित बातम्या :
Corona | ‘बेबी डॉल’ गायिका कनिका कपूरला कोरोना, विमानतळावरुन पळाल्याचा आरोप
मुख्यमंत्र्यांचं हृदयाचं ऑपरेशन, तरीही राज्यासाठी योद्ध्याप्रमाणे लढत आहेत : जितेंद्र आव्हाड