मुंबई : कोरोना काळात अनेक कुटुंबांवर संकटाचा डोंगर कोसळलाय. घरातील कमावत्या व्यक्ती कोरोनाच्या बळी ठरल्यात त्यामुळे जवळच्यांना गमावल्याच्या दुःखासोबतच आर्थिक संकटाचाही सामना करावा लागत आहे. अशातच IDFC FIRST Bank आपल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी धावून आलीय. बँकेने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केलीय. यानुसार कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून वार्षिक CTC च्या चारपट पैसे दिले जाणार आहेत. याशिवाय पुढील 2 वर्षांपर्यंत कुटुंबाला पूर्ण पगार दिला जाईल (Big announcement of IDFC First bank for family of employee dead due to Corona).
या योजनेबाबत माहिती देताना बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व्ही. वैद्यनाथन म्हणाले, “बैंकेचे बहुतांश कर्मचारी तरुण आहेत. त्यातील कुणाचाही मृत्यू झाल्यास कुटुंबाला मोठा धक्का बसतो. अशा वेळी त्यांची मदत करण्यासाठी आम्ही महत्त्वाचा निर्णय घेतलाय. याशिवाय बँक कर्मचाऱ्यांचं होम लोन, कार लोन, पर्सनल लोन, बाईक लोन, एज्युकेशन लोनसह वेगवेगळे कर्ज माफ करण्यात येणार आहेत. कर्ज माफ केल्यानं कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावरील आर्थिक बोजा कमी होईल.”
बँक आपल्या किती कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय याची माहिती घेत आहे. त्या सर्व कुटुंबांना हा आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक म्हणाले, “जर बँक कर्मचाऱ्यांनी बँकेकडून कर्ज घेतलेले असेल तर त्यांचं सर्व कर्जही माफ केलं जाणार आहे. होम लोन 25 लाख रुपयांपर्यंत माफ केलं जाईल.”
या योजनेची डेडलाईन 30 जून 2021 ठेवण्यात आलीय. याशिवाय 25 लाख रुपयांवर अधिकचं होम लोन असेल तर ते फेडण्यासाठी देखील कमी ईएमआयची व्यवस्था करण्यात येणार आहे. हे हप्ते पुढील 2 वर्षे मिळणाऱ्या पगारातूनही देता येणार आहेत.
वी वैद्यनाथन म्हणाले, “कोरोना काळात बँकेच्या जवळपास 20 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय. आम्ही या सर्वांच्या कुटुंबाशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांना बँकेकडून करण्यात येणाऱ्या मदतीची माहिती देण्यात येत आहे. जर मृत कर्मचाऱ्यांच्या मुलांपैकी कुणाला नोकरी करायची असेल तर आम्ही नोकरीही देणार आहोत. जर त्यांच्याकडे बँकेसोबत काम करण्यासाठीची क्षमता नसेल तर त्यांना प्रशिक्षण घेण्यासाठी 2 लाख रुपये स्वतंत्रपणाने दिले जातील.”
“कर्मचाऱ्यांना कोरोना आहे तोपर्यंत ही मदत मिळत राहिल. याशिवाय बँकेने ‘Employee Covid Care Scheme 2021’ चीही घोषणा केलीय. यात कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला 30 हजार रुपये अंत्यविधी खर्च म्हणून दिले जाणार आहेत. 2 मुलांना पदवी शिक्षणासाठी महिन्याला 10 हजार रुपये मिळतील. जर त्यांच्या कुटुंबाला दुसरीकडे स्थलांतरित व्हायचं असेल तर त्यांना त्यासाठी वेगळे 50 हजार रुपये दिले जातील. याशिवाय कर्मचाऱ्यांनी जितके दिवस काम केलं तितके दिवसांचा बोनसही देण्यात येईल,” अशी माहिती देण्यात आलीय.
हेही वाचा :
व्हिडीओ पाहा :
Big announcement of IDFC First bank for family of employee dead due to Corona