मुंबई : देशाची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँकेकडून रिलायन्स कॅपिटल लिमिटेडवर कारवाई करण्यात आली आहे. अनिल अंबानी यांच्या समूहातील या कंपनीचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. रखडलेली देणी आणि कारभारातील गंभीर त्रुटी यामुळे संचालक मंडळ बरखास्त करण्यात येत असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. संचालक मंडळ बरखास्त केल्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रचे माजी कार्यकारी संचालक नागेश्वर राव वाय. यांची रिलायन्स कॅपिटलचे प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
रिलायन्स कॅपिटलवर करण्यात आलेल्या कारवाईची माहिती देण्यासाठी आरबीआयकडून एक पत्रक जारी करण्यात आले आहे. या पत्रकात आरबीआयने म्हटले आहे की, रिलायन्स कॅपिटलकडे अनेक देणीदारांची देणी रखडलेली आहेत. तसेच कारभारामध्ये देखील अनेक त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे कंपनीचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या बँक ऑफ महाराष्ट्रचे माजी कार्यकारी संचालक नागेश्वर राव वाय. हे रिलायन्स कॅपिटलचे प्रशासक म्हणून काम पहातील. नादारी व दिवाळखोरी नियम 2019 अंतर्गत कारवाई करून, लवकरच ज्या देणीदारांचे पैसे थकले आहेत, त्यांचे प्रश्न सोडवण्यात येणार असल्याचे आरबीआयच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
वित्तीय सेवा क्षेत्रातील थकबाकीदारांवर दिवाळखोरीची कारवाई करण्यासाठी आरबीआयच्या वतीने पाऊले उचलण्यात येत आहेत. या अंतर्गंत कारवाई झालेली रिलायन्स कॅपिटल ही चौथी कंपनी आहे. उपलब्ध माहितीनुसार, थकीत देणी आणि दीर्घमुदतीचे कर्ज मिळून रिलायन्स कॅपिटलचे एकूण थकीत आर्थिक दायित्व 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत 21781 कोटी रुपयांचे असून, त्यात संचित व्याजाचाही समावेश आहे. सप्टेंबरमध्ये भागधारकांच्या वार्षिक सभेत कर्जदायीत्व 40 हजार कोटींच्या घरात असल्याची माहिती कंपनीच्या वतीने देण्यात आली होती.
तुम्हाला नवीन व्यवयाय सुरू करायचाय? तर जीएसटीबाबत जाणून घ्या ‘हे’ महत्त्वाचे नियम
भारतात क्रिप्टोकरन्सीचे स्वरुप नेमके कसे असणार? सरकार अधिवेशनात मांडणार विधेयक
December Bank Holiday List : डिसेंबर 2021 मध्ये 12 दिवस बँका बंद, एका क्लिकवर संपूर्ण यादी