नवी दिल्ली | 2 February 2024 : GST आल्यापासून बजेटमध्ये स्वस्त आणि महाग अशा वर्गीकरणातील वस्तू बोटावर मोजण्याइतक्याच राहिल्या आहेत. आता केवळ त्याच वस्तूंच्या भावावर थेट परिणाम होतो, ज्यांचा संबंध उत्पादन शुल्क आणि सीमा शुल्क यांच्याशी येतो. या अंतरिम बजेटमध्ये सरकारने कोणत्याही शुल्कात काहीच बदल केलेला नाही. त्यामुळे अर्थसंकल्पात कोणतीची वस्तू स्वस्त झाली नाही. पण एका वर्षात महागाईचा परिणाम दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणात दिसून आला. अन्नधान्य आणि रोजच्या वापरातील वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. दूध, साखर, टोमॅटो आणि कांद्याच्या किंमतीत एका वर्षात मोठी वाढ झाली.
अन्नधान्याच्या अशा वाढल्या किंमती
- तूरडाळ एका वर्षात 110 रुपयांहून 150 रुपयांच्या घरात
- तांदूळ एका वर्षात 37 रुपयांहून 45 रुपये अथवा त्यापेक्षा जास्त
- दूधाची किंमत 52 रुपयांहून 59 रुपये अथवा त्यापेक्षा अधिक
- साखरेचा भाव 40 रुपयांहून 44 रुपये
- इतर अनेक वस्तूंचे भाव पण गगनाला भिडले आहेत
- प्रत्येक शहरात आणि वस्तूच्या प्रतिनूसार किंमतीत बदल दिसतो
महागाईचा परिणाम काय
- भाजीपाल्याच्या किंमतीत 2023 मध्ये खूप चढउतार दिसला. गेल्या वर्षी जुलै ते ऑगस्ट महिन्यात टोमॅटोच्या किंमती 250-300 रुपयांच्या घरात पोहचल्या. आयात धोरणात बदल केल्याने या किंमती घसरल्या. कांद्याच्या किंमतीत पण याच काळात मोठी वाढ होत असताना सरकारच्या हस्तक्षेपानंतर किंमती घसरल्या. पण मोदी सरकारच्या कार्यकाळात महागाईच्या झळा बसल्या आहेत.
- पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत एका वर्षात वाढ दिसलेली नाही. पण किंमती वाढल्यापासून त्यात कपात झालेली नाही. केंद्र आणि राज्य सरकारने त्यावरील कराचे ओझे कमी केले, तेवढाच काय तो दिलासा मिळालेला आहे. जागतिक बाजारात कच्चे तेल स्वस्त असतानाही त्याचा दिलासा वाहनधारकांना मिळालेला नाही. या महागाईत मध्यमवर्ग सर्वाधिक होरपळला गेला आहे. वाढलेला ईएमआय, कोलमडलेले बजेट यामुळे त्यांना फटका बसला आहे.
- सोने-चांदीत वाढ झाल्याने खरेदीदार हिरमुसले आहे तर गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. 1 जानेवारी 2023 रोजी सोन्याची किंमत 54,867 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. आता हा भाव 62 हजार रुपयांच्या घरात पोहचला आहे. तर चांदी 69 हजारांवरुन 72 हजार रुपये किलोवर पोहचली आहे.
- आरबीआयने गेल्या एप्रिल 2023 पासून रेपो दर जैसे थे ठेवले आहेत. ही ग्राहकांसाठी तात्पुरती मलम पट्टी ठरील आहे. कारण ग्राहकांना अगोदरच वाढीव व्याजदराने ईएमआय भरावा लागत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये रेपो रेट 6.5 टक्के होता. तेव्हापासून रेपो दरात बदल झालेला नाही. रेपो दरात कपात न झाल्याने व्याजदर वाढला आहे. त्याचा फटका बसला आहे.