नवी दिल्ली : प्रत्येकाचे स्वतःचे घर असावे, हे स्वप्न असते. कर्ज कितीही महागले तरी लोकांचा ओढा हा कर्ज काढून घर घेण्यावर (Home Loan) असतो. जर तुम्हाला कोणी सांगितले की, घर खरेदीपेक्षा भाड्याच्या घरात (Rent House) राहणे कधीही फायदेशीर आहे, तर ? तुम्ही त्याला मुर्खात काढाल. पण आर्थिक गणित मांडलं तर त्यात बरंच तथ्य आढळतं. कोणत्याही मालमत्तेचे मूल्य हे त्याच्या ठिकाणावर अवलंबून असते. जसे जिथे तुम्ही घर खरेदी करता, अथवा तयार करत आहात , तिथे वाहतूक सुविधा, रुग्णालय आणि इतर सोयी-सुविधांआधारे मालमत्तेचा दर (Property Cost) निश्चित होतो.
साधारणपणे एखाद्या शहरात 2BHK सदनिका (Flat)खरेदीसाठी 25 ते 35 लाखांदरम्यान खर्च येतो. सोयी-सुविधा अधिक असतील तर ही किंमत अजून वाढते. या सदनिका खरेदीसाठी 5-6 लाख रुपये डाऊनपेमेंट करावे लागते. स्टॅम्प ड्युटी, नोंदणी असा मिळून हा खर्च 10 लाख रुपयांच्या घरात पोहचतो.
35 लाखांच्या घरासाठी तुम्हाला 40 लाख रुपयांच्या आसपास खर्च येईल. 10 लाख रुपयांचा खर्च वगळता 30 लाख रुपयांचे तुम्ही बँकेकडून गृहकर्ज घ्याल. सरासरी 8 टक्के व्याजदराने गृहकर्ज गृहीत धरल्यास तुम्हाला दरमहा एक ठराविक ईएमआय द्यावा लागेल.
आरबीआयच्या धोरणानुसार, रेपो दरात चढ-उतार झाल्यास त्यानुसार गृहकर्जाचा हप्ताही कमी जास्त होईल. 20 वर्षांसाठी 30 लाखांचे कर्ज घेतले तर तुम्हाला 25 हजार रुपयांचा ईएमआय चुकता करावा लागेल.
सरासरी फ्लॅटचे भाडे 10 हजार रुपये गृहीत धरल्यास, ईएमआय हप्त्यापेक्षा तुमची 15 हजार रुपयांची दरमहा बचत होईल. ही रक्कम तुम्ही व्यवस्थित गुंतवल्यास तुम्हाला त्यातून जोरदार परतावा मिळेल. पण योग्य बचत योजना निवडावी लागेल.
म्युच्युअल फंडात SIP हा सर्वात चांगला पर्याय आहे. सरासरी हा परतावा 10-12 टक्के मिळतो. जर 12 टक्के परतावा मिळत असेल तर हा फायदाचा सौदा ठरतो. SIP आधारे 20 वर्षांसाठी दर महा 15 हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास 36 लाख रुपये जमा होतील.
कमीत कमी 12 टक्के व्याजाने परतावा गृहीत धरल्यास 20 वर्षानंतर गुंतवणूकदाराकडे 1.50 कोटी रुपये जमा होतील. तर 15 टक्के परतावा गृहीत धरल्यास 20 वर्षानंतर ही रक्कम 2.28 कोटी रुपये होईल.