पूर्वी गुंतवणूक म्हटले की, बँकेत किंवा पोस्टातील एखाद्या स्कीममध्ये गुंतवणूक केली जात होती. तसेच निवृत्तीनंतर (retirement) मिळणारी रक्कम बँकेत किंवा पोस्टात एफडी करुन त्यापासून मिळत असलेल्या व्याजावर समाधान मानले जात होते. परंतु गेल्या काही वर्षांपासून सर्वत्र म्युच्युअल फंडबाबत (mutual funds) जनजागृती होत आहे. अनेक जुनेजाणते अद्यापही याकडे वळले नसले तरी ज्यांचा म्युच्युअल फंडबाबत चांगला अभ्यास झाला आहे, ती मंडळी आता पारंपारीक गुंतवणूक प्रकाराच्या पलीकडे जात विचार करीत आहेत. आज प्रत्येकजण आर्थिक स्वातंत्र्याबद्दल (Financial freedom) बोलतो.
जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आवश्यक आर्थिक संसाधने मिळत असली तरी योग्य वेळी योग्य निर्णय होणे महत्वाचे असतात. आपण वयाच्या कोणत्याही टप्प्यासाठी एक टार्गेट ठेवून गुंतवणूक केली असेल, तर त्याचा परतावा तुम्हाला वेळीच मिळायला हवा. आर्थिक तज्ज्ञांच्या मते, आपल्या देशात अजूनही निवृत्ती नियोजनाची ‘कल्चर’ रुढ झालेले नाही. वाढती महागाई, वैद्यकीय खर्च, कालांतराने व्याजदरात झालेली घसरण अशा स्थितीत निवृत्तीचे नियोजन आवश्यक आहे. त्यासाठी अनेकांकडून म्युच्युअल फंडच्या पर्यायाची चाचपणी केली जात आहे.
गुंतवणुकीच्या पारंपारिक साधनांमधील परतावा खूपच कमी झाला आहे. अशा वेळी म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना आकर्षित करत आहेत. आर्थिक तज्ज्ञ असेही म्हणतात, की जर तुमची थोडीशी जोखीम घेण्याची तयारी असेल तर तुम्ही म्युच्युअल फंडाचा वापर निवृत्ती योजना म्हणून करू शकता. तुम्ही जितक्या लवकर गुंतवणूक करायला सुरुवात कराल तितका ‘रिटायरमेंट कॉर्पस मोठा असेल. म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचे फायदे जाणून घेऊया.
1) तुम्ही निवृत्तीसाठी म्युच्युअल फंडात दर महिन्याला एसआयपी म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन करू शकता. विशेष म्हणजे ही रक्कम दर महिन्याला कमी असू शकते. जेव्हा बाजार घसरतो तेव्हा ‘एनएव्ही’ ची किंमत कमी होते. या संधीचा फायदा घ्या आणि दीर्घकालीन गुंतवणूक करा.
2) निवृत्ती नियोजनासाठी, गुंतवणूक योजनेचा परतावा महागाईपेक्षा जास्त असावा. सध्या महागाईचा दर 5 ते 6 टक्क्यांच्या दरम्यान आहे. अशा परिस्थितीत गुंतवणुकीच्या पारंपरिक मार्गाने गुंतवणूक केल्यास निव्वळ परतावा कमी मिळेल. म्युच्युअल फंडामध्ये, तुमचे पैसे शेअर मार्केटमध्येही गुंतवले जातात, ज्यामुळे परतावा जास्त असतो आणि तुमचा निव्वळ परतावा जास्त असतो.
3) म्युच्युअल फंडातील ‘एसआयपी’ सोबत, वेळोवेळी अतिरिक्त पैशांची अतिरिक्त एनएव्ही खरेदी करत रहा. म्युच्युअल फंडात तुम्ही ज्या दिवशी तुमची रक्कम विकू इच्छिता त्या दिवसाच्या चार कामकाजाच्या दिवसांत पैसे खात्यावर असतील. इतर गुंतवणूक साधनांमध्ये लॉक-इन कालावधी असतो. कर आकारणीच्या दृष्टीने, इक्विटी फंडातील दीर्घकालीन भांडवली नफ्यावर 10 टक्के कर आकारला जातो. अल्पकालीन भांडवली नफ्यावर 15 टक़्के कर आकारला जातो. 12 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या गुंतवणुकीला शॉर्ट टर्म आणि त्याहून अधिक कालावधीच्या गुंतवणुकीला दीर्घकालीन म्हणतात.
4) डेट फंडांसाठी, 36 महिन्यांपेक्षा कमी कालावधीची गुंतवणूक अल्प मुदतीच्या अंतर्गत आणि त्याहून अधिक दीर्घ मुदतीच्या अंतर्गत येते. तुमच्या एकूण उत्पन्नामध्ये अल्पकालीन नफा जोडला जातो आणि टॅक्स ब्रॅकेटनुसार कर आकारला जातो. दीर्घकालीन भांडवली नफ्यावर 20 टक्के कर आकारला जातो.
संबंधित बातम्या :
मारुती सुझुकीच्या वाहन विक्रित घट, टाटा मोटर्सची विक्री 27 टक्क्यांनी वाढली
अखेर मोठ्या वादानंतर अशनीर ग्रोवर यांनी BharatPe चा राजीनामा दिला, वाचा संपूर्ण प्रकरण नेमके काय?