पणजी: मोटार वाहन विमा घोटाळ्यांमुळे देशात कार्यरत असलेल्या विमा कंपन्यांना (insurance company) 1200 कोटी रुपयांचा व्यावसायिक तोटा झाला आहे. त्यामुळे 2021-22 या आर्थिक वर्षात केंद्र सरकारचे (central government) तब्बल 216 कोटी रुपयांचे कररुपी नुकसान झाले आहे, असा दावा ‘बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स’चे इन्वेस्टिगेशन आणि लॉस मिटिगेशन विभागाचे प्रमुख संजीव द्विवेदी (sanjeev dwivedi) यांनी केला आहे. विमा क्षेत्रातील ‘असोसिएशन ऑफ इन्वेस्टिगेटर्स अॅंड डिटेक्टिव्हज’ (एआयडी) या संघटनेने पणजीत आयोजित केलेल्या ‘क्षितिज’ या दोन दिवसीय परिसंवादात द्विवेदी बोलत होते. विमा दाव्यांपैकी फक्त 0.5 टक्के प्रकरणंच तपासली जातात, असं सांगत कोविड महासाथीनंतर विमा क्षेत्रातील घोटाळ्यांमध्ये वाढ झाली आहे. हा विमा घोटाळा म्हणजे हिमनगाचं फक्त टोक आहे, असंही द्विवेदी यांनी सांगितलं.
‘असोसिएशन ऑफ इन्वेस्टिगेटर्स अँड डिटेक्टिव्हज’ने ‘क्षितिज’ नावाने परिसंवाद आयोजित केला होता. या परिसंवादात देशभरातून विमा क्षेत्राशी संबंधित खासगी इन्वेस्टिगेटर्स आले होते. त्यांनी विमा दाव्यांशी संबंधित पडताळणी प्रक्रियेचे विविध पैलू आणि संभाव्य घोटाळे, सायबर घोटाळे, इन्वेस्टिगेशनमध्ये विविध गॅजेट्सचा- तंत्रज्ञानाचा वापर आदी बाबींवर सविस्तर चर्चा केली. असोसिएशन ऑफ इन्वेस्टिगेटर्स अँड डिटेक्टिव्हज’ (एआयडी) चे संस्थापक संचालक सुरेंद्र जग्गा यांनीही यावेळी आपले मत मांडलं. विमा क्षेत्रात खासगी इन्वेस्टिगेटर्सची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. विमा दाव्यांच्या चौकशी- तपासणी- पडताळणीच्या प्रक्रियेतील खासगी इन्वेस्टिगेटर्सच्या योगदानाची दखल सरकारने घ्यायला हवी, कारण विमा घोटाळ्यांमुळे केवळ विमा कंपन्यांचं नुकसान होत नसून सरकारचंही खूप मोठं नुकसान होत आहे. वाढत्या विमा घोटाळ्यांना आळा घालण्यासाठी विमा कंपन्यांनी केवळ प्रमाणित (सर्टिफाइड) आणि प्रशिक्षित इन्वेस्टिगेटर्सनाच भरती करुन घ्यावं, असा सल्ला सुरेंद्र जग्गा यांनी यावेळी दिला.
जगभरातील अनेक मोठे उद्योजक तसंच व्यावसायिकांसाठी ‘डाटा (विदा) उल्लंघन तसंच चोरी’ रोखणं हे एक खूप मोठं आव्हान बनलं आहे. त्यामुळे वर्तमान काळातील सायबर आर्थिक गुन्ह्यांची वाढती संख्या पाहता भविष्यात सायबर विमा क्षेत्रात इन्वेस्टिगेटर्सना प्रचंड मोठी व्यावसायिक संधी उपलब्ध होणार आहे, असं मत सायबर गुन्हे इन्वेस्टिगेटर आणि प्रमाणित एथिकल हॅकर सचिन देढिया यांनी व्यक्त केलं. दरम्यान, ‘असोसिएशन ऑफ इन्वेस्टिगेटर्स अॅंड डिटेक्टिव्हज’चे संचालक तुषार विश्वकर्मा आणि आशिष देसाई यांनी विमा क्षेत्राशी संबंधित खासगी इन्वेस्टिगेटर्सनी आपल्या कौशल्ये आणि ज्ञान सतत विकसित करणे गरजेचे आहे, अशी भूमिका परिसंवादात मांडली.