पुणे : पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत, पुण्यात (pune) पेट्रोल 120 रुपये लिटरवर पोहोचले आहे, तर डिझेलने देखील शंभरी पार केली आहे. काही दिवसांपूर्वीच शहरात सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली होती. एकूण महागाईच्या कचाट्यात सापडलेल्या पुणेकरांना आणखी एक धक्का बसला आहे, तो म्हणजे पुन्हा एकदा सीएनजीच्या दरात प्रति किलोमागे पाच रुपयांची वाढ (CNG rates hike) करण्यात आली आहे. सीएनजीचे दर 68 रुपये प्रति किलोवरुन 73 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. आजपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत. या वाढीमागचे प्रमुख कारण म्हणेज सीएनजी गॅसच्या मिश्रणात एका विशिष्ट आयातित वायूची वाढ झाली आहे. त्या विशिष्ट गॅसची किंमत ही आंतरराष्ट्रीय बाजारात दुप्पट झाल्याने सीएनजीचे भाव वाढवण्यात आल्याचे बोलले जात आहे. सीएनजी गॅस प्रति किलो पाच रुपयांनी महाग झाल्याने याचा मोठा फटका हा ग्राहकांना बसणार आहे, आधीच महागाई वाढत आहे. पेट्रोल, डिझेलसारख्या इंधनाच्या दरात देखील भरमसाठ वाढ झाली आहे. आता त्यात भरीसभर म्हणजे सीएनजी देखील महाग झाला आहे.
काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने सीएनजीवरील व्हॅटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. तशी घोषणा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये केली होती. त्यानुसार व्हॅटमध्ये साडेतेरा टक्क्यांची कपात करण्यात आली. व्हॅटमध्ये कपात करण्यात आल्याने सीएनजी प्रति किलो मागे सहा रुपयांनी तर पीएनजी साडेतीन रुपयांनी स्वस्त झाला होता. सीएनजी स्वस्त झाल्याने रिक्षा, चालक तसेच खासगी वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाल्याचे पहायला मिळाले. मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही. त्यानंतर पुन्हा एकदा सीएनजी कंपन्यांकडून दर वाढवण्यात आले आहेत. आता पुण्यात सीएनजी प्रति किलो 68 रुपयांवरून 73 रुपयांवर पोहोचला आहे.
एकीकडे सीएनजीच्या दरात आज किलोमागे पाच रुपयांची वाढ झाली आहे, मात्र दुसरीकडे दिलासादायक बातमी म्हणेज आज पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आज सलग सातव्या दिवशी पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. गेल्या 22 मार्चपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होती. मात्र मागील सात दिवसांपासून इंधन दरवाढीला ब्रेक लागल्याने सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
‘आरबीआय’ नियंत्रित बाजाराची वेळ बदलली ; सोमवार पासून सकाळी ‘नऊ’ ला सुरू होईल कामकाज
उत्तम काम आणि निष्ठेचं बक्षीस! चेन्नईच्या कंपनीने 100 कर्मचाऱ्यांना आलीशान कार भेट, 5 जणांना BMW