Digital Labour Chowk : भाकरीचा चंद्र शोधणाऱ्यांची भटकंती थांबली; देशातील मजुरांचा ऑनलाईन चौक; रोजंदारी कामगारांसाठी भारतातील पहिले जॉब पोर्टल

| Updated on: Aug 21, 2024 | 2:06 PM

Online Labour chowk : 'भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली', कामगारांच्या जिंदगाणीला शब्दांचा साज चढवणारे प्रख्यात कवी नारायण सुर्वे यांनी कामगारांच्या सुगंधी जखमा आपल्यासमोर आणल्या. काळानुरुप अनेक बदल झाले, आता मजुरांसाठी भारतातील पहिले जॉब पोर्टल सुरू झाले.

Digital Labour Chowk : भाकरीचा चंद्र शोधणाऱ्यांची भटकंती थांबली; देशातील मजुरांचा ऑनलाईन चौक; रोजंदारी कामगारांसाठी भारतातील पहिले जॉब पोर्टल
रोजंदारी कामगारांसाठी जॉब पोर्टल
Image Credit source: डिजिटल लेबर चौक
Follow us on

‘दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले, हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे, शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुले, रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली.’ कविवर्य नारायण सुर्वे यांनी कामगारांच्या सुंगधी जखमा अशा समोर आणल्या. कामगार, मजूर, शेतमजूर या कष्टकरी जमातीच्या खडतर आयुष्यात आता आशेचा एक किरण उगवला आहे. भाकरीचा चंद्र शोधण्यात नव उमेद मिळाली आहे. देशातील रोजंदारी कामगारांसाठी भारतातील पहिले जॉब पोर्टल सुरू झाले आहे. तंत्रज्ञानाचा शिरकाव आता या क्षेत्रात पण झाला आहे. मिळकत तर वाढलीच आहे, तर कामगारांना हक्काची, श्रमाच्या मोबदल्याची जाणीव होत आहे, हे ही नसे थोडके.

कोरोनाने कामगारांना जिणे बेहाल

कोरोना या महामारीने जग जणू थांबले होते. देशात अचानक लॉकडाऊन जाहीर झाला. त्यावेळी मजूर, कामगार, वेठबिगारांचे हाल उभ्या देशाने पाहिले. घरी जाण्यासाठी सुरुवातीला हजारो किलोमीटरची पायपीट, उपवास, अनंत अडचणी, विलगीकरण, ना-ना अडचणी त्यांच्या नशीब आली. कामगारांना आजही कोणी वाली नसल्याचे समोर आले. या डिजिटल युगाने मोठे बदल केले. नवीन स्टार्टअप्स सुरु झाले. अनेकांना नवीन कल्पना सुचल्या. चंद्रशेखर मंडल या तरुणाला पण कामगारांच्या या हालअपेष्टा पहावल्या नाहीत. त्याने या कामगारांच्या जीवनात डिजीटल क्रांती आणण्याचा निश्चिय केला.

हे सुद्धा वाचा

फोटो सौजन्य: डिजिटल लेबर चौक

चंद्रशेखर मंडल यांची युनिक आयडिया

बिहारमधील चंद्रशेखर मंडल हे मुळचे बिहारचे, कॉर्पोरेट जॉबनिमित्ताने ते दिल्लीत नव्यानेच आले होते. कोरोना सुरु होण्याच्या काही दिवस अगोदर त्यांनी दिल्लीत नोकरी सुरु केली होती. कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावरुन ते अनेकदा समोरील चौकातील रोजंदारी कामगारांचे निरीक्षण करत असत. जीवनातील ही विषमता ते बघत होते. शिक्षण घेतले. पदवी हातात असेल, अक्कलहुशारी असेल तर जीवन किती बदलतं. पण ज्यांच्या जीवनात शिक्षणाचा कवडसा सुद्धा पडला नाही, त्यांना जीवनात किती संघर्ष करावा लागतो हे ते नेहमी पाहत होते.

अनेक मोठ्या शहरात असे कामगार चौक आहेत. आपल्या राज्यातील अनेक शहरात कामगार चौक आहेत. या ठिकाणी रोजंदारी कामगार रोजगार मिळेल या आशेने येतात. कंत्राटदार अथवा घरातील काही कामासाठी लोक या चौकात येऊन कामगारांना घेऊन जातात. रोजंदारीसाठी घासाघीस होते. सौदा जमला तर कामगार त्यांच्यासोबत जातो. काम करुन दिवसभराची बिदागी घेतो. ऊन,थंडी वारा सोसत हा कामगार या चौकात एका अडोश्याला दिवसाच्या भाकरीच्या चिंतेत उभा असतो. चंद्रशेखर मंडल यांना हे चित्र नित्याचेच झाले होते. जग इतके झपाट्याने बदलले आहे. मग या कामगारांसाठी ऑनलाईन जॉब का नाहीत, या विचाराने ते चमकून गेले. या डिजिटल युगात त्यांच्यासाठी डिजिटल चौक का नाहीत, या प्रश्नाने त्यांची झोप उडवली. पुढे कोराना काळात कामगारांच्या हालअपेष्टा पाहिल्यावर ते अस्वस्थ झाले. मजूर, कष्टकऱ्यांसाठी नोकऱ्यांचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुरु करण्याची खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली.

डिजिटल लेबर चौकचा श्रीगणेशा

चंद्रशेखर मंडल लॉकडाऊन काळात त्यांच्या कल्पनेवर काम करत होते. त्यांनी डिजिटल लेबर चौक हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुरु केला. बिहारच्या दरभंगामधील अमी या छोट्या गावातील मंडल यांनी मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी डिजिटल लेबर चौक हे पोर्टल सुरु केले. कंपनीने गेल्या तीन वर्षांत 1 लाखांहून अधिक कामगारांना रोजगार मिळवून दिला. लाखो स्थलांतरीत कामगारांच्या आयुष्यात बदल घडवला.

लॉकडाऊन शिथील झाला होता. पण आजाराचा फैलाव होऊ नये यासाठी काही नियम आखून दिले होते. त्याचे पालन करणे आवश्यक होते. एका हाताचे अंतर ठेवा, असा नियम पाळणे कामगार चौकात कसे शक्य होते? त्याकाळात उदरनिर्वाहासाठी कामगारांना संघर्ष करावा लागला होता. कामगारांच्या नेमक्या समस्या जाणून घेण्यासाठी मंडल हे बिहार, नोएडा आणि दिल्लीतील कामगार चौकात गेले. तिथे त्यांनी अनेक दिवस निरीक्षण केले. कामगारांशी चर्चा केली. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. चार महिने मंडल हे काम करते होते. विशेषतः बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी काय करता येईल याचा विचार मंडल यांच्या डोक्यात फिरत होता.

अनेक शहरातून हे कामगार मोठ्या शहरात रोजंदारीच्या निमित्ताने आले होते. अनेकांच्या तर काही पिढ्या या शहरात गेल्या होत्या. त्यांच्या जीवनात मोठा फरक पडलेला नव्हता. कोरोना काळात अनेकांना पुन्हा जीवनातील ते कटू अनुभव नको होते. अनेकांनी त्यांच्या व्यथा मंडल यांना सांगितल्या. मंडल यांना रोजंदारी कामगारांसाठी रोजगाराचे ऑनलाईन पोर्टल सुरु करण्याचे निश्चित झाले. त्यासाठीचा आरखडा त्यांनी आखला. बांधकाम व्यावसायिक आणि या क्षेत्रातील अनेकांशी त्यांनी चर्चा केली.

अकुशल कामगारांची मोठी फौज

शेतीनंतर बांधकाम क्षेत्र हे देशात सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र असल्याचे मंडल यांच्या लक्षात आले. त्यांनी याविषयीची आकडेवारी गोळा केली. या क्षेत्रातील 80 टक्क्यांहून कामगार हे अकुशल असल्याचे त्यांच्या लक्षात आले. आजच्या भाकरीचा प्रश्न सोडवणे इतकेच त्यांचे ध्येय असल्याचे समोर आले. या कामगारांना रोजंदारीवर काम करताना अनेक अडचणींचा सामना कराव लागतो, याची त्यांना जाणीव झाली.

होतकरु आणि कुशल तरुणांना LinkedIn, Naukri, Indeed आणि इतर व्हाईट कॉलर जॉब देणारे प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. मग कामगारांसाठी ब्लू-कॉलर नोकऱ्यांसाठी एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म का नसावा, या विचाराने डिजिटल कामगार चौक सुरु झाला. श्रमिकांना त्याच्या स्मार्टफोनवरुनच नोकरी शोधता आली पाहिजे, या कल्पनेवर हे पोर्टल सुरु करण्यात आले होते.

20,000 रुपयांच्या भांडवलावर डिजिटल लेबर चौकाची सुरुवात

आता हेच काम करायचे हे चंद्रशेखर मंडल यांनी निश्चित केले. सप्टेंबर 2020 मध्ये त्यांनी नोकरी सोडली. तेव्हा त्यांच्या खिशात 20,000 रुपयांचे भांडवल होते. त्यांना CA होण्याची इच्छा होती. त्यासाठी तयारी सुरु केली होती. पण मध्येच कामगारांसाठी काही करायच्या विचाराने त्यांना झपाटून टाकले. नोकरी सोडून ते गावी आले. तेव्हा घरच्यांना ही गोष्ट काही रुचली नाही. सुरुवातीचे महिने अत्यंत कठीण गेले. या प्रकल्पासाठी कर्ज मिळावे म्हणून त्यांनी सरकारी योजनांकडे मोर्चा वळवला. कर्जासाठी अर्जफाटे सुरु केले.

फोटो सौजन्य: डिजिटल लेबर चौक

पुण्यातून मिळाले धन

डिजिटल लेबर चौक प्रायव्हेट लिमिटेड ची नोंदणी झाली. काम सुरु झाले. पुण्यातील एका गुंतवणूकदाराने मदतीचा हात पुढे केला. या स्टार्टअप्सला ऑगस्ट 2021 मध्ये 10 लाख रुपयांचा निधी मिळाला. त्यानंतर मदतीचा ओघ सुरु झाला. ही कल्पना अनेकांना भावली. त्यांनी या कंपनीत गुंतवणूक सुरु केली. वेबसाईट तयार झाली. ॲप्लिकेशन तयार झाले. कायदेशीर आणि तांत्रिक बाजू भक्कम करण्यात आली. आता कामगारांना या प्लॅटफॉर्मवर जोडण्याचे कठीण कार्य बाकी होते. तर मजूरांच्या हाताला काम देणारे ग्राहक शोधण्याची अवघड कामगिरी पण पार पाडायची होती.

सर्वच धावले मदतीला

या कामगार चौकातील दुकानदारांशी या मजुरांची चांगली ओळख असल्याचे मंडल यांना माहिती होतं. त्यामुळे या कामगारांची नोंदणी करण्याचे काम त्यांना दिले, तर अधिक अचुकता येईल आणि काम झटपट संपेल हे त्यांनी हेरले. त्यांनी या व्यवसायात या दुकानदारांना फ्रँचाईज दिली. कामगारांची डिजिटल श्रमिक ॲपवर नोंदणी सुरु झाली. उन्हाळ्यात कामगार चौकात रुहअफझा तर हिवाळ्यात या चौकात चहा वाटप सुरु झाल्याने कामगारांशी मैत्री वाढली. त्यांच्या लक्षात आमचे प्रयत्न आले. त्यांच्या फायद्याचे गणित कळाले. उत्तर भारतातील अनेक जिल्ह्यात किऑस्क सुरु करण्यात आले. उत्तर भारतातील बिल्डर्स असोसिएशन, स्थावर संपदा नियामक-रिअल इस्टेट अथॉरिटीसोबत (RERA) त्यांनी करार केला.

डिजिटल कामगार चौक ॲपवर कामाची माहिती देण्यात येते. रोजंदारीची माहिती, काम किती दिवस चालणार, त्यादरम्यान इतर सुविधा काय देण्यात येणार, कामाचे स्वरुप, कामाची स्थिती, कामाचे ठिकाण याची माहिती अगोदरच उपलब्ध असते. अर्थात हे सर्व काम हंगामी, काही दिवस, महिने अथवा वर्षांचे असते. कामगार त्याच्या सोयीनुसार त्याची निवड करु शकतात. एक काम संपले की त्याला दुसऱ्या ठिकाणी कामाची सोय उपलब्ध असते. रोजगाराविषयीची माहिती या ॲपवर उपलब्ध असते.