एलन मस्क(Elon Musk) सध्या टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) असून लवकरच ते ट्विटरचे सीईओ होऊ शकतात. मात्र, त्यांच्या खांद्यावर ट्विटरच्या सीईओ पदाची (Elon Musk may become Twitter CEO) ही तात्पुरती धुरा असेल. त्यामुळे ट्विटरचे विद्यमान सीईओ पराग अग्रवाल (Parag Agrawal) हे पायउतार होतील हे निश्चित मानले जात आहे. एलन मस्क सध्या 44 अब्ज डॉलरचा निधी गोळा करण्यात गुंतले आहेत. हा करार पूर्ण झाल्यानंतरच त्यांना ट्विटरची कमान सांभाळता येणार आहे. जॅक डोर्सी यांना पदावरून कमी केल्यानंतर पाच महिन्यांपूर्वीच पराग अग्रवाल ट्विटरचे सीईओ झाले होते. नोव्हेंबर महिन्यात त्यांनी पदभार स्वीकारला. टाऊनहॉलच्या बैठकीत पराग अग्रवाल म्हणाले की, ट्विटरचं भविष्य एलन मस्क यांच्या हातात आहे. रॉयटर्सच्या (Reuters) रिपोर्टनुसार, मस्क ट्विटरच्या सीईओच्या शोधात आहेत आणि सीईओ पदाची माळ जॅक डोर्सी यांच्या गळ्यात पडण्याची चिन्हे आहेत. ते पुन्हा ट्विटरमध्ये घरवापसी करतील असे अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये मानले जात आहे.
ट्विटरची सूत्रे स्वत:च्या हाती घेतल्यानंतर मस्क मोठ्या प्रमाणात टाळेबंदी करू शकतात, असेही मानले जात आहे. या माध्यमातून त्यांना कंपनीचा ऑपरेशनल कॉस्ट कमी करायचा आहे. सध्या ट्विटरचे कर्मचारी भेदरलेल्या स्थितीत आहेत. मेट माला इव्हेंटमध्ये मस्क यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की, जर एखादा कर्मचारी कंपनीत खुश नसेल तर ते स्वत:साठी नवीन ठिकाणी जागा शोधू शकतात.
रिपोर्ट्सनुसार, पराग अग्रवालला 12 महिन्यांच्या आत काढून टाकल्यास एलन मस्कला त्याला 43 मिलियन डॉलर म्हणजेच 300 कोटी रुपये द्यावे लागतील. याशिवाय ट्विटरच्या लीगल हेड विजया गाडे यांचंही काम धोक्यात आलं आहे. मस्क यांनी यापूर्वीच त्यांना लक्ष्य केले आहे. त्यालाही तत्काळ प्रभावाने नोकरीवरून काढून टाकल्यास मस्क यांना 90 कोटी रुपयेही द्यावे लागतील.
एलन मस्क 46 अब्ज डॉलर उभारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. त्यांनी वैयक्तिक अर्थसाहाय्य 21 अब्ज डॉलरवरून 27.5 अब्ज डॉलरपर्यंत वाढवले आहे. यासाठी त्यांनी 19 गुंतवणूकदारांकडून 7 अब्ज डॉलरचा निधी जमा केला आहे. मॉर्गन स्टॅन्लेने कर्जाची रक्कम आधीच्या 12.5 अब्ज डॉलरवरून 6.25 अब्ज डॉलरपर्यंत कमी केली आहे. याशिवाय ट्विटरच्या बदल्यात बँकांकडून 13 अब्ज डॉलरचे कर्ज घेत आहेत.