मुंबई : अका आठवड्यात डिसेंबर महिनाच नाही तर वर्षही संपणार आहे. नवीन वर्षाचं सेलिब्रेशन सुरू करण्यापूर्वी, लाखोंचं नुकसान वाचावं, असं वाटत असेल तर EPFO डेडलाइनच्या आधी काही महत्त्वाची कामं करा. महिन्याच्या शेवटच्या तारखेला येणार्या मुदतींपैकी एक म्हणजे EPFOचं ई-नामांकन. हे काम आत्तापर्यंत प्रलंबित असल्यास आधी ते पूर्ण करा, नाहीतर सात लाख रुपयांपर्यंत नुकसान सहन करावं लागू शकतं.
पीएफ खातेधारकांसाठी ई-नामांकन अनिवार्य
ईपीएफओनं आता सर्व पीएफ खातेधारकांना नॉमिनी जोडणं अनिवार्य केलंय. पीएफ खातेधारकांच्या अवलंबितांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी हा प्रयत्न आहे. पीएफ खातेधारकांना काही अनुचित प्रकार घडल्यास, आश्रितांना नॉमिनी म्हणून ठेवल्यानं त्यांना विमा आणि पेन्शनसारखं संरक्षण मिळतं. यासाठी EPFOनं नॉमिनी जोडणं अनिवार्य केलंय.
करू शकता एकापेक्षा जास्त नॉमिनी
सर्व पीएफ खातेधारक घरी बसून नॉमिनी जोडण्याचं काम करू शकतात. खातेधारकांना एकापेक्षा जास्त नॉमिनी जोडण्याची मान्यता ईपीएफओ देतं. कोणत्या नॉमिनीला नफ्यात वाटा मिळेल, हे खातेदारदेखील ठरवू शकतो. हे काम ऑनलाइन करता येतं.
नॉमिनी बदलण्याचीही सोय
ईपीएफओनं स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत ई-नॉमिनेशनची मोहीम सुरू केली. जर खातेधारकानं नॉमिनी जोडले नाहीत, तर तो त्याच्या पीएफ खात्यातून कोणताही व्यवहार करू शकणार नाही. याशिवाय अशा खातेदारांना सात लाखांच्या विमा संरक्षणाचा लाभही मिळणार नाही. EPFOनं त्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2021 ठरवलीय. ईपीएफओनं अशी सुविधाही दिलीय, की खातेदार त्याला पाहिजे तितक्या वेळा नॉमिनी बदलू शकतो.
घरी बसून करा ई-नॉमिनेशन
1: सर्वप्रथम EPFOची अधिकृत वेबसाइट उघडा.
2: आता तुम्हाला UAN आणि पासवर्डच्या मदतीनं लॉग इन करावे लागेल.
3: मॅनेज सेक्शनवर जा आणि ई-नॉमिनेशन या लिंकवर क्लिक करा.
4: नॉमिनीचं नाव, फोटो आणि इतर तपशील सबमिट करा.
5: एकापेक्षा जास्त नॉमिनी जोडण्यासाठी, Add New बटणावर क्लिक करा.
6: Save Family Detailsवर क्लिक करताच प्रक्रिया पूर्ण होईल.