नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यात जगभरातील टेक कंपन्यांनी (Tech Companies) मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात (Lay Off) केली आहे. यामागे चुकलेली धोरणे आणि व्यवस्थापनातील बदल ही कारणे समोर येत असली तरी, आर्थिक मंदीची (Recession) चाहूल हे प्रमुख कारण असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेकांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे.
Twitter, Facebook, Netflix, Microsoft, Snapchat सह इतर अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपातीचे धोरण अवलंबिले आहे. त्यामुळे अनेक जण झटक्यात बेरोजगार झाले आहेत. तर काहींच्या स्वप्नांना धुमारे फुटण्याअगोदरच सुरुंग लागला आहे.
यातील अनेक कंपन्यांनी यापूर्वी विस्तार करण्याच्या नावाखाली, नवी प्रकल्पासाठी कर्मचाऱ्यांची मोठी भरती केली. परंतु, अवघ्या काही महिन्यातच कंपन्यांनी नोकर कपातीचा बडगा उगारला. त्यामुळे काही दिवसताच कर्मचाऱ्यांसमोर दुसरी नोकरी शोधण्याचे संकट उभे ठाकले.
Microsoft कंपनीत फार मोठी उलथा पालथ दिसत नसली. कंपनी उत्पादनात अग्रेसर असली तरी मंदीच्या भीतीने कंपनीने गेल्या महिन्यात 1000 कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले होते. या वर्षातील कंपनीची ही तिसरी मोठी कर्मचारी कपात आहे.
Netflix कंपनीचा युझर बेस पक्का झाला आहे. त्यात सातत्याने वाढ ही झाली आहे. पण खर्च कपात आणि मंदीच्या भीतीने या कंपनीने 500 कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. मे आणि जून महिन्यात कंपनीला आर्थिक फटका बसला आहे.
Snapchat, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या या कंपनीनेही कर्मचारी कपात केलेली आहे. ऑगस्ट महिन्यात कंपनीने 1000 कर्मचाऱ्यांना घरी पाठवले होते. वाढता खर्च आणि मंदीची आशंकेमुळे कंपनीने हे पाऊल उचलेल होते.
Twitter मध्ये खांदेपालट होताच, कर्मचाऱ्यांवर कुऱ्हाड कोसळली. एलॉन मस्कने जवळपास 3700 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखविला. पण तीन दिवसानंतर त्यातील काही कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर बोलाविले. पण किती जणांना पुन्हा बोलाविले ते समोर आले नाही.
सर्वाधिक फटका बसला तो Facebook च्या कर्मचाऱ्यांना. या कंपनीने तब्बल 11,000 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले. आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यसाठी हे पाऊल टाकत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
Amazon मधून ही कर्मचारी काढण्यात आले आहेत. पण त्यांची संख्या किती आहे, याची माहिती समोर आलेली नाही. नफा कमविण्यात अपयश आलेल्या युनिट्समधील कर्मचाऱ्यांना दुसऱ्या ठिकाणी नोकरी शोधण्याचे संकेत देण्यात आले आहे.