नवी दिल्ली: भारतीय रेल्वेच्या इतिहासात प्रथमच एसी कोचमधून चॉकलेटची वाहतूक करण्यात आली. देशात प्रथमच दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागाने हे काम केले आहे. या रेल्वे विभागात काही एसी डबे रिक्त होते, ज्याचा वापर चॉकलेट आणि इतर खाद्यपदार्थ वाहून नेण्यासाठी करण्यात आला. चॉकलेट आणि इतर मालाच्या वाहतुकीत तापमानाची पातळी नियंत्रित करावी लागते. त्यामुळे या मालाची वाहतूक एसी कोचमध्ये होते.
हा माल गोव्यातील वास्को-द-गामा स्थानकावरून दिल्लीच्या ओखला येथे पाठवण्यात आला होता. 8 ऑक्टोबर रोजी ही मालगाडी गोवा येथून निघाली ज्यामध्ये एसी कंपार्टमेंटमध्ये चॉकलेट आणि नूडल्स भरले होते. संपूर्ण ट्रेनच्या 18 एसी डब्यांमध्ये सामान नेण्यात आले. हा माल AVG लॉजिस्टिक्सचा होता. ट्रेनने गोवा ते ओखला, दिल्ली हे 2115 किमी अंतर कापले. या कामासाठी रेल्वेला 12.83 लाख रुपये मिळाले आहेत.
हुबळीच्या बिझनेस डेव्हलपमेंट युनिटकडून (BDU) ही कामगिरी पार पाडण्यात आली. बीडीयूने चॉकलेटच्या वाहतुकीसाठी एव्हीजी लॉजिस्टिक्सशी करार केला . माल दिल्लीला नेण्याची जबाबदारी घेतली. या नवीन मार्गाने मालाची वाहतूक केल्यानंतर रेल्वेला उत्पन्नाचे नवे साधन मिळाले आहे. आतापर्यंत माल फक्त हुबळी विभागातून रस्ते मार्गाने नेला जात होता, ज्यावर व्यापाऱ्यांना बराच खर्च करावा लागत होता. मालाच्या सुरक्षेसाठी वेगळी डोकेदुखी होती. एसी ट्रकमधून माल हलवायचा, ज्याला कित्येक दिवस लागायचे. परंतु रेल्वेने हे काम अवघ्या 24 तासांत केले कारण त्याच्याकडे आधीच एसी कक्षासारखी संसाधने आहेत.
बीडीयूच्या या यशस्वी प्रयत्नाचे हुबळीचे विभागीय व्यवस्थापक अरविंद मालखेडे यांनी खूप कौतुक केले आहे. मालखेडे म्हणाले की, रेल्वे नेहमीच लोकांच्या सेवेसाठी सज्ज असते, जिथे वाहतुकीची प्रचंड कामे उच्च वेगाने, कोणत्याही अडचणीशिवाय आणि कमी खर्चात सहजपणे पूर्ण केली जातात. व्यापारी संघटनांनीही रेल्वेच्या या कारवाईचे कौतुक केले आहे. ऑक्टोबर 2020 नंतर, पार्सल हुबळी विभागात दरमहा 1 कोटी रुपये कमवत आहे. सप्टेंबर 2021 मध्ये या विभागाने पार्सल वाहतुकीतून 1.58 कोटींची कमाई केली आहे. या आर्थिक वर्षात हुबळी विभागाच्या कमाईचा एकूण आकडा 11.17 कोटींच्या पुढे गेला आहे.
कोरोना संकटाच्या काळात प्रवासी वाहतूक बराच काळ बंद असूनही रेल्वेने मालवाहतुकीच्या माध्यमातून उत्पन्नाची भरपाई केली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये रेल्वेच्या माध्यमातून होणाऱ्या मालवाहतुकीचे प्रमाण वाढले असून त्यामुळे सध्या रेल्वेला ‘अच्छे दिन’ आले आहेत. सप्टेंबर 2021 मध्ये रेल्वेचे मालवाहतूक लोडिंग गेल्या वर्षीच्या याच महिन्यापेक्षा 3.62 टक्के जास्त होते. रेल्वेने ही माहिती दिली आहे.
सप्टेंबर महिन्यात रेल्वेने 106 दशलक्ष टन मालाची वाहतूक केली. गेल्यावर्षी याच कालावधीत हे प्रमाण 102.3 दशलक्ष टन होते. त्यामुळे यंदा यामध्ये 3.62 टक्क्यांची भर पडली आहे. मालवाहतूक सुलभ करण्यासाठी भारतीय रेल्वेकडून संबंधित ग्राहकांना अनेक सवलती देखील दिल्या जात आहेत. या कालावधीत, भारतीय रेल्वेने मालवाहतुकीतून 10,815.73 कोटी रुपयांची कमाई केली. जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 9.19 टक्के जास्त आहे. गेल्या वर्षी गेल्यावर्षी याच कालावधीत रेल्वेला मालवाहतूक करुन 9,905.69 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते.
संबंधित बातम्या:
Indian Railways: आता ट्रेन्स डिझेल नव्हे तर ‘या’ नव्या इंधनावर धावणार, वर्षाला 2.3 कोटींची बचत
रेल्वे 500 पेक्षा अधिक गाड्या बंद करणार? प्रवासी संख्येतील घट आणि तोट्यामुळे मोठा निर्णय!
भारतीय रेल्वेसोबत करा ‘हा’ व्यवसाय, कमी भांडवल गुंतवूनही व्हाल मालामाल