नवी दिल्ली : नवं वर्ष उजाडण्यासाठी काही तासच शिल्लक आहेत. सरत्या वर्षाचा आढावा घेऊन नव्या वर्षात प्रवेश करण्यासाठी उद्योगविश्व सरसावलं आहे. उद्योगांच्या गतवर्षाच्या ताळेबंदासोबत कामगार स्थितीचे अहवाल समोर आले आहेत. ई-मार्केट(E-Market)मध्ये कार्यरत कंपन्यांच्या विश्वात फ्लिपकार्ट कंपनी कामगारांना अनुकूल सेवा पुरविणाऱ्या यादीत पहिली कंपनी ठरली आहे. फेअरवर्क फाउंडेशन(Fairwork Foundation)ने विविध मानकांच्या आधारावर अहवालाची निर्मिती केली आहे. वर्ष 2021चा अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आला.
ओला व उबर कंपनीची कामगिरी खालावली
फेअरवर्कने ई-कॉमर्स क्षेत्रातील दहा कंपन्यांची निवड केली. विविध मानकांच्या आधारावर कंपन्यांतील कामगिरी स्थिती अनुसार गुणांकन करण्यात आले. दहापैकी गुणांकन नोंदविण्यात आले. आघाडीची ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट(Flipkart)ला दहा पैकी सात गुण देण्यात आले आहेत. अर्बन कंपनी दुसऱ्या स्थानावर आहे. ई-राईड सेवा देणाऱ्या ओला व उबर कंपनीची कामगिरी अहवालात खालावली आहे. दोन्ही कंपन्यांना यादीत तळाचे मिळाले आहे. फूड डिलिव्हरीमधील बिगबास्केट व स्विगीला दहा पैकी चार गुण मिळाले आहेत.
अहवाल नेमका कशाच्या आधारावर?
फेअरवर्कच्या अहवालात एकूण 10 कंपन्यांतील कामगार स्थितीचे संशोधन करण्यात आले आहे. वेतन, कामाची स्थिती, करार, व्यवस्थापन आणि प्रतिनिधित्व या मानकांचा संशोधनासाठी आधार घेण्यात आला आहे.
अहवालात समाविष्ट ई-कॉमर्स कंपन्या
फ्लिपकार्ट, अर्बन कंपनी, बिगबास्केट, स्विगी, झोमॅटो, डंझो, फार्मईझी, ओला, पोर्टर आणि उबर.
अहवालातील प्रमुख मुद्दे दृष्टीक्षेपात
-कोविडचा भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा आर्थिक फटका बसल्याचे निरीक्षण अहवालात नोंदविण्यात आले आहे.
-कोविड निर्बंधामुळे ई-कॉमर्स कंपन्यांचे राईड शेअरिंग सर्व्हिस, फूड डिलिव्हरी इ. व्यवहार प्रभावित झाले आहेत.
-फेअरवर्कच्या अहवालात कमी गुणांकन मिळालेल्या कंपन्यांत कामगारांना अनुकूल स्थिती नसल्याचे म्हटले आहे. कामाच्या वेळा, अपुरे वेतन, कामाची असुरक्षितता यांचा समावेश होतो.
– किमान वेतन निश्चित करण्यासाठी बिगबास्केट, फ्लिपकार्ट, अर्बन कंपनीने किमान वेतन स्तर निश्चित करण्यासाठी धोरणांची आखणी केल्याचे अहवालात म्हटले आहे.