मुंबई: सोन्याच्या दरात गुरुवारी झालेल्या घसरणीनंतर मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्ये (MCX) शुक्रवारी वेगळे चित्र पाहायला मिळाले. आज बाजार उघडल्यानंतर सोन्याच्या दरांनी पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. त्यामुळे सोन्याचा (Gold) प्रतितोळा दर 155 रुपयांनी वाढून 47,113 रुपये इतका झाला आहे. यापूर्वी गुरुवारी सोन्याच्या दरात 1500 रुपयांची घट पाहायला मिळाली होती. तर चांदीच्या दरातही आज 736 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे चांदीचा दर प्रतिकिलो 68,335 रुपये इतका झाला आहे. (Gold and Silver rate today)
आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी सोने आणि चांदीचा भाव वधारला असला तरी गेल्या काही दिवसांत दोन्ही धातूंच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. सोने हा गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय असला तरी त्यावर कोणतेही व्याज मिळत नाही. गुंतवणुकदारांच्या या मानसिकतेमुळे आगामी दिवसांत सोन्याच्या दरात तीव्र चढउतार पाहायला मिळू शकतात.
अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने व्याजदर वाढीचे संकेत दिल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचे नकारात्मक पडसाद उमटताना दिसत आहेत. त्यामुळे भारतीय शेअर बाजारात गुरुवारी घसरण पाहायला मिळाली होती. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर रुपयाची किंमतही घसरली आहे. रुपयाचे मूल्य गुरुवारच्या व्यवहारात तब्बल 76 पैशांनी कमजोर बनले. प्रति डॉलर 74.08 असा वर्षांतील नीचांक स्तरावर रुपया ढकलला गेला आहे.
देशभरात 16 जूनपासून सोन्याच्या दागिन्यांची विक्री करताना त्यावर हॉलमार्क असणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमानुसार, आता 14,18 आणि 22 कॅरेटच्या सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क (BIS Hallmark) असेल तरच त्यांची विक्री करता येईल. अन्यथा संबंधित सराफा व्यापाऱ्याला दागिन्याच्या किंमतीच्या पाचपट दंड अथवा एक वर्षाचा कारावास होऊ शकतो.
केंद्र सरकारने दागिन्यांसाठी हॉलमार्किंग बंधनकारक केले असले तरी काही गोष्टींना यामधून वगळण्यात आले आहे. यामध्ये सोन्याची घड्याळे, फाऊंटन पेन, कुंदन, पोलकी, जडाव यासारख्या विशिष्ट दागिन्यांचा समावेश आहे. हॉलमार्किंगसाठीची नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन स्वरुपातही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्व सराफा व्यापाऱ्यांना आपल्या दागिन्यांवर हॉलमार्किंग लावणे बंधनकारक राहील.
संबंधित बातम्या:
स्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी, प्रतितोळा दर 47 हजाराच्या खाली, वाचा नवे भाव…
सोनं खरं की खोटं कसं ओळखाल? आता प्रत्येक दागिन्यावर ‘ही’ 4 चिन्ह पाहा, उत्तर मिळेल
(Gold and Silver rate today)