पुणेः गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. सोन्याच्या भावाने आज मोठी उसळी घेतली असून, प्रतिग्रॅम दरात तब्बल एक हजाराची वाढ झालीय. दिवाळीमुळे मागणी जास्त असून, पुरवठा कमी असल्याने सोन्याच्या दरात वाढ झाली. कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने खरेदीचे मुहूर्त हुकले होते. त्यामुळे दिवाळीमध्ये लोकांनी मोठी खरेदी केली. त्याचबरोबर आता लग्नसराई सुरू झाली असून, त्यामुळे सोन्याला मोठी मागणी वाढलीय.
काल 24 कॅरेट सोन्याचा दर हा 48 हजार 350 रुपये प्रतितोळा होता. तो दर आज 49 हजार 300 रुपयांपर्यंत गेला. 22 कॅरेट सोन्याचा काल 45 हजार 700 दर होता. तो आज 46 हजार 700 झाला आहे. तर 18 कॅरेट सोन्याचा दर काल 38 हजार तीनशे प्रति तोळा होता. तो दर 39 हजार 200 रुपये इतका झाला आहे, अशी माहिती इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोशियनचे राज्याचे समन्वयक किरण आळंदीकर यांनी दिली.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांनी सांगितले की, कॉमेक्स ट्रेडिंगवर स्पॉट गोल्डच्या किमतीसह सोन्याच्या किमती कमजोरीने व्यवहार करत होत्या. ते पुढे म्हणाले की, मजबूत डॉलर आणि यूएस बाँड उत्पन्नात वाढ झाल्याने सोन्याच्या किमती दबावाखाली व्यवहार करत आहेत.
तुम्ही दररोज घरबसल्या सोन्याचा भाव जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक संदेश येईल, ज्यामध्ये तुम्ही सोने आणि चांदीचे नवे दर पाहू शकता.
पुढच्या काही वर्षांत सोन्याच्या किंमती आभाळाला टेकणार असल्याचा असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. HDFC सिक्योरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते, पुढच्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. याच काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर प्रतिऔंस 3000 ते 5000 डॉलर्स इतका असू शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमवीर अनेक देशांमध्ये आर्थिक पॅकेजेस (Stimulus Package) दिली जात आहेत. मात्र, त्यामुळे मध्यवर्ती बँकांची अवस्था बिकट होऊ शकते. परिणामी आगामी काळात सोन्याचे दर अक्षरश: गगनाला भिडू शकतात, असे क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून सांगण्यात आले आहे.
संबंधित बातम्या
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक विमा उत्पादने विकणार, Bajaj Allianz सोबत हातमिळवणी
Share Market Updates: सलग तिसऱ्या दिवशी बाजार घसरल्याने गुंतवणूकदारांचे दीड लाख कोटी बुडाले