रशिया आणि युक्रेन तर दुसरीकडे इस्त्रायल अनेक आघाड्यांवर युद्धात गुंतला आहे. हमासनंतर आता लेबनॉनच्या सीमेवर त्याने हिजबुल्लाहच्या आघाडीवर मोर्चा उघडला आहे. अमेरिकेत व्याजदर मंदावला आहे. तर भारतात आता सणांचा उत्सव सुरू होत आहे. या सर्व गोष्टींचा परिपाक म्हणजे सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ होत आहे. या दोन आठवड्यात सोने आणि चांदीने चौकार आणि षटकार हाणले. दरवाढीच्या पिचवर या दोन्ही मौल्यवान धातुनी दिमाखदार कामगिरी केली आहे. सध्या मौल्यवान धातुत घसरण दिसत असली तरी लवकरच किंमती वाढण्याची शक्यता आहे. आता असा आहे सोने आणि चांदीचा भाव (Gold Silver Price Today 1 October 2024 )
उंच भरारीनंतर सोन्यात घसरण
गेल्या आठवड्यात सोने 1500 रुपयांहून अधिकने वधारले. तर त्यापूर्वी सुद्धा सोन्याची घोडदौड सुरूच होती. या महिन्याच्या सुरुवातीला सोन्याने विश्रांती घेतली. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस 30 सप्टेंबर रोजी किंमती 160 रुपयांनी उतरल्या. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 70,095 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,390 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीच्या घोडदौडीला लगाम
मागील दोन आठवड्यात चांदीने 6,000 रुपयांची उसळी घेतली. गेल्या आठवड्यात त्यात 3,000 रुपयांची भर पडली होती. तर गेल्या महिन्याच्या अखेरच्या दिवसात चांदीने आराम केला. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी चांदीच्या किंमतीत बदल दिसला नाही. आज सकाळच्या सत्रात चांदीत घसरणीचे चिन्ह आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 95,000 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 75,197, 23 कॅरेट 74,896, 22 कॅरेट सोने 68,881 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 56,398 रुपये, 14 कॅरेट सोने 43,990 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 89,400 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
पितृपक्षात सोने खरेदीचा मुहूर्त केव्हा?
पितृपक्षात सोने आणि चांदी खरेदी वर्ज्य आहे. अर्थात शास्त्रात याविषयीचे स्पष्ट संकेत अथवा नियम नाहीत. पूर्वजांची, पित्रांचे स्मरण होत असल्याने या काळात मोठी खरेदी टाळणे योग्य असे मानण्यात येते. पण पितृ पक्षात अशी एक तिथी आहे, ज्यावेळी सोने आणि चांदी खरेदी शुभ मानण्यात येते. पितृ पक्षाच्या अष्टमी तिथीला मौल्यवान धातूची खरेदी शुभ मानण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. अर्थात शास्त्रात याविषयीचा काय नियम आहे हे समजावून घेऊनच ग्राहकांनी खरेदी करावी.
घरबसल्या जाणून घ्या भाव
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.