पितृपक्षामुळे सोने आणि चांदीने स्वस्ताईचा चौकार लगावला. गेल्या चार दिवसांत किंमतीत मोठा फरक दिसला. गेल्या आठवड्यात सोने 1 हजारांनी तर चांदी 8 हजारांनी महागली होती. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी पण भाव वधारले होते. पण पितृपक्षात अनेक ग्राहक बाजारपेठेत फिरकत नसल्याने दोन्ही धातूच्या किंमतीत मोठा फरक दिसून आला. अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याज दरात कपात केल्याचा परिणाम लवकरच बाजारावर दिसून येईल. सध्या अशा आहेत सोने आणि चांदीच्या किंमती (Gold Silver Price Today 20 September 2024 )
सोन्यात आली स्वस्ताई
गेल्या आठवड्यात सोन्याने मोठी घौडदौड करत 900 रुपयांनी किंमती वधारल्या. 17 सप्टेंबरला भाव 150 रुपयांनी उतरला. तर 18 सप्टेंबर 160 रुपयांनी घसरण झाली. 19 सप्टेंबर रोजी सोने एकूण 250 रुपयांनी स्वस्त झाले. आज सकाळच्या सत्रात सुध्दा भावात घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 68,400 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 74,600 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदी झाली स्वस्त
गेल्या आठ दिवसांत चांदी 8 हजार रुपयांनी महागली होती. सोमवारी 16 सप्टेंबर रोजी भाव एक हजार रुपयांनी वधारला होता. पितृपक्ष लागल्यानंतर किंमती घसरल्या. 17 आणि 18 सप्टेंबर रोजी प्रत्येकी एक हजारांनी चांदी उतरली. आज सकाळच्या सत्रात पण चांदीत घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 90,900 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 73,485, 23 कॅरेट 73,191, 22 कॅरेट सोने 67,312 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 55,114 रुपये, 14 कॅरेट सोने 42,989 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 88,418 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
पितृपक्षात सोने खरेदीचा मुहूर्त केव्हा?
पितृपक्षात सोने आणि चांदी खरेदी वर्ज्य आहे. अर्थात शास्त्रात याविषयीचे स्पष्ट संकेत अथवा नियम नाहीत. पूर्वजांची, पित्रांचे स्मरण होत असल्याने या काळात मोठी खरेदी टाळणे योग्य असे मानण्यात येते. पण पितृ पक्षात अशी एक तिथी आहे, ज्यावेळी सोने आणि चांदी खरेदी शुभ मानण्यात येते. पितृ पक्षाच्या अष्टमी तिथीला मौल्यवान धातूची खरेदी शुभ मानण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. अर्थात शास्त्रात याविषयीचा काय नियम आहे हे समजावून घेऊनच ग्राहकांनी खरेदी करावी.