नवी दिल्ली | 8 ऑक्टोबर 2023 : सोने-चांदीने जागतिक घडामोडींना वाकूल्या दाखवल्या. दोन्ही मौल्यवान धातू पुन्हा तेजीत आले. जागतिक घडामोडींचा परिणाम दोन्ही धातूंवर दिसून आला. त्यात भारतीय सराफा बाजारपेठेत पितृपक्षामुळे म्हणावी तशी गर्दी नाही. या काळात कोणतीही नवीन वस्तू खरेदी करणे शुभ मानण्यात येत नसल्याने ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे सोने-चांदीने गेल्या चार महिन्यातील निच्चांक गाठला आहे. पण गेल्या वर्षीच्या तुलनेत या किंमती जादा असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. जानेवारी, फेब्रुवारी आणि एप्रिल महिन्यात सोने-चांदीने चांगलीच आघाडी घेतली होती. सोने-चांदीत (Gold Silver Rate Today 8 October 2023) मोठी घसरण होणार असल्याचा अंदाज पण वर्तविण्यात येत आहे. दरवाढीला पोषक असणाऱ्या अनेक घटकांवर परिणाम झाल्याने मौल्यवान धातूत ही घसरण येण्याचा अंदाज आहे.
अचानक आली तेजी
गुडरिटर्न्सनुसार, शनिवारी, 7 ऑक्टोबर रोजी सोन्यात अचानक तेजी आली. सोन्यात जवळपास 300 रुपयांची दरवाढ दिसून आली. यापूर्वी 1 ऑक्टोबर रोजी भाव स्थिर होता. 2 ऑक्टोबरला 150 रुपयांनी भाव उतरले. 3 ऑक्टोबर रोजी 650 रुपयांनी भाव आपटले. 4 ऑक्टोबर रोजी भाव जैसे थे होते. 5 ऑक्टोबरला 200 रुपयांनी भाव उतरले. 22 कॅरेट सोने 52,900 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 57,690 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.
चांदीत दिसली तेजी
गेल्या महिन्यात चांदीला आघाडी घेता आली नाही. महिन्याच्या पहिल्या सत्रात किंमती 5000 रुपयांनी पडल्या. मध्यंतरी चांदीने चढाईचा प्रयत्न केला खरा पण लांबचा पल्ला गाठता आला नाही. 1 ऑक्टोबर रोजी किंमती जैसे थे होत्या. 2 ऑक्टोबर रोजी चांदी 500 रुपयांनी स्वस्त झाली. 3 ऑक्टोबर रोजी चांदी 2000 रुपयांची पडझड दिसली. 4 ऑक्टोबरला 300 रुपयांनी भाव घसरले. 5 ऑक्टोबर आणि 6 ऑक्टोबर रोजी अनुक्रमे 400 आणि 500 रुपयांनी किंमती घसरल्या. 7 ऑक्टोबर रोजी चांदीने 1500 रुपयांची आघाडी घेतली. गुडरिटर्न्सनुसार, सध्या एक किलो चांदीचा भाव 72,100 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेट असा आहे भाव
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 56,539 रुपयांपर्यंत घसरले. 23 कॅरेट 56,313 रुपये, 22 कॅरेट सोने 51790 रुपये, 18 कॅरेट 42,404 रुपये, 14 कॅरेट सोने 33,075 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 67,095 रुपयांपर्यंत झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
BIS Care APP
सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.