गुगलसारख्या (Google) मोठ्या कंपनीत काम करण्याचे स्वप्न अनेकांचे असते. त्यासाठी बरेच जण जीवतोड मेहनत करतात. तुम्हीही गुगलमध्ये काम करण्यास इच्छुक आहात का ? यंदा गुगलमध्ये नक्की किती भरती होणार ? या सर्व मुद्यांबद्दल नवी माहिती समोर आली आहे. सध्या अनेक मोठमोठ्या कंपन्यांना मंदीच्या सावटाची भीती आहे. गुगलही त्याला अपवाद नाही. मेटा कंपनीनंतर गुगलनेही कर्मचाऱ्यांच्या भरतीला चाप लावण्याचा निर्णय घेतला आहे. गुगलची मूळ कंपनी असलेल्या ‘अल्फाबेट’चे (Alphabet) सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनी कर्मचाऱ्यांना उद्देशून लिहीलेल्या ई-मेलमधून ही माहिती समोर आली आहे. यंदा केवळ आवश्यक सेवा विभागासाठी कर्मचारी भरती सुरु राहील, असे पिचाई यांनी नमूद केले आहे. 2022-2023 या वर्षांत कंपनीचा फोकस केवळ इंजिनियरिंग, तांत्रिक तज्ज्ञ आणि महत्त्वपूर्ण पदावरील कर्मचाऱ्यांच्या भरतीवर असेल.
‘इतर कंपन्यांप्रमाणेच आपल्यालाही आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. अनिश्चित वैश्विक आर्थिक परिस्थितीकडे आपण कानाडोळा करू शकत नाही. अशा आव्हानांकडे आम्ही संकट म्हणून नव्हे तर एक संधी म्हणून पाहतो,’ असे सुंदर पिचाई यांनी ई-मेलमध्ये नमूद केले आहे.
2022-2023 या वर्षांत इंजिनिअरिंग, टेक्निकल (तांत्रिक विभाग) आणि इतर आवश्यक सेवा विभागात कर्मचारी भरती करण्यावर कंपनीचा संपूर्ण फोकस असेल. दुसऱ्या तिमाहीतच आम्ही गुगलमध्ये 10 हजार कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. यावर्षी ठरवण्यात आलेले भरतीचे लक्ष्य पूर्ण झाले आहे. त्यामुळेच आता उरलेल्या कालावधीत भरतीची प्रक्रिया थोडी मंदावणार आहे,’ असे पिचाई यांनी ई-मेलमध्ये लिहीले आहे.पिचाई यांच्या ई-मेलवरून हे स्पष्ट होतं की गुगललाही येत्या काळात येणारे आर्थिक मंदीचे संकट दिसू लागलं आहे. त्यामुळे ज्या विभागात कर्मचाऱ्यांच्या पूर्ण संख्येअभावी काम होऊ शकणार नाही, अशाच विभागातील कर्मचाऱ्यांना कायम राखण्याचा निर्णय गुगलने घेतला आहे.
12 जुलै रोजी कर्मचारी निवडणूक आयोगाद्वारे (SSC) दिल्ली पोलीस (DP), भारतीय सेनेसाठी प्रादेशिक सेना अधिकारी, भारतीय नौसेना आणि उत्तर प्रदेश राज्य विद्युत उत्पादन निगम लिमिटेड (UPRVUNL) मध्ये 5 हजारांपेक्षा जास्त पदांसाठी भरती सुरु होणार आहे. त्याशिवाय यूपीएससीद्वारेही बऱ्यांच जागांसाठी भरती सुरू होणार आहे.