नवी दिल्ली : सरकारच्या कठोर भूमिकेनंतर गुगलने शनिवारी प्ले स्टोअरवरून काढून टाकलेले सर्व ॲप्स पुन्हा एकदा सुरू केले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुगल प्ले स्टोरवर Shaadi.com, Info Edge’s Naukri.com, 99Acres आणि Naukri Gulf सारखे ॲप्स पुन्हा लिस्ट केले आहेत. Google ने आपल्या Play Store वरून काही भारतीय ॲप्स काढून टाकले होते. यानंतर सरकारने लगेचच कठोर भूमिका घेतली. सरकारने गुगल आणि संबंधित स्टार्टअप्सना या संदर्भात पुढील आठवड्यात बैठकीसाठी बोलावले आहे. आयटी आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, स्टार्टअप इकोसिस्टम ही भारतीय अर्थव्यवस्थेची गुरुकिल्ली आहे.
गुगलने आपल्या प्ले स्टोअरवरुन काढून टाकलेले सर्व भारतीय ॲप्स रिस्टोअर केले आहेत. इन्फो एजचे सह-संस्थापक संजीव बिकचंदानी यांनीही X वरील पोस्टमध्ये याची पुष्टी केली आहे. त्याने पोस्ट केले की अनेक इन्फो एज ॲप्स प्ले स्टोअरवर परत आले आहेत. इंटरनेट आणि मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया (IAMAI) ने भारतीय कंपन्यांचे ॲप्स काढून टाकल्याबद्दल टीका केली होती. त्यांनी Google ला ते काढून टाकलेले ॲप्स प्ले स्टोअरवर रिस्टोर करण्यासल सांगितले होते. Google ने Matrimony आणि Shaadi.com या सारखे प्रमुख भारतीय डिजिटल कंपन्यांचे ॲप प्ले स्टोअरवरून काढून टाकले होते.
सरकारने कडक भूमिका घेतल्यानंतर अश्विनी वैष्णव म्हणाले की, गुगलला भारतीय ॲप्स काढून टाकण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. भारत सरकारचे धोरण अगदी स्पष्ट आहे. आमच्या स्टार्टअप्सना आवश्यक ते संरक्षण मिळेल.’
हा वाद सोडवण्यासाठी सरकारने गुगल आणि ॲप कंपन्यांना बैठकीसाठी बोलावले आहे. पुढील आठवड्यात ही भेट होणार आहे. ते म्हणाले की, भारताने 10 वर्षांत एक लाखाहून अधिक स्टार्टअप आणि 100 हून अधिक युनिकॉर्नची मजबूत स्टार्टअप इकोसिस्टम तयार केली आहे. तरुण आणि उद्योजकांच्या ऊर्जेला योग्य दिशा दिली पाहिजे आणि ती मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या धोरणांवर सोडता येणार नाही.’