नवी दिल्ली : देशासह जगातील मोठ्या कंपन्यांमध्ये आज रिलायन्स इंडस्ट्रीजचं (Reliance Industry) नाव घेतलं जाते. या साम्राज्याची पहिली वीट धीरुभाई अंबानी यांनी बसवली. 6 जुलै 2002 रोजी त्यांचे निधन झाले. धीरुभाई यांनी शुन्यापासून सुरुवात केली आणि साम्राज्य तयार केले. मुळात त्यांच्या घरात उद्योगाचे वातावरण नव्हते की त्यांना कोणाचा पाठिंबा होता. पण त्यांनी हा प्रवास सोनेरी केली. केवळ 500 रुपये आणि तीन खुर्च्यांच्या कार्यालयातून रिलायन्सचा कारभार सुरु झाला. त्यानंतर हे अफाट साम्राज्य तयार झाले. त्यांच्याकडे व्यवसायातील गमक होते. व्यवसायाची बाराखडी त्यांना माहिती होती. त्यातूनच तावून सलाखून ते धीरजलाल हिराचंद , धीरुभाई अंबानी (Dhirubhai Ambani) झाले.
कुटुंबाला लावला हातभार
धीरुभाई अंबानी यांचा जन्म 28 डिसेंबर 1933 रोजी गुजरातमधील एका गावात झाला. त्यांचे वडील शिक्षक तर आई गृहिणी होती. पाच भाऊ आणि बहिण असे त्यांचे कुटुंब होते. कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा म्हणून त्यांनी लहानपणापासूनच छोटे-मोठे काम केले. गिरनार पर्वतावर ते खाद्यपदार्थाची विक्री करत होते. आलेला पैसा ते आई-वडिलांना द्यायचे.
या देशात मुक्काम
दहावी परीक्षा पास झाल्यावर 1949 मध्ये ते भाऊ रमणीकलाल यांच्याकडे यमन देशात गेले. तिथे त्यांनी एका पेट्रोल पंपावर नोकरी केली. 300 रुपये महिना पगार होता. काम आणि प्रामाणिकपणा पाहून पेट्रोल पंप मालकाने त्यांना व्यवस्थापक केले. पण फार काळ या नोकरीत त्यांचे मन रमले नाही. ते देशात परतले.
500 रुपयांपासून सुरुवात
खिशात 500 रुपये घेऊन ते मुंबईत दाखल झाले. नातेवाईक चंपकलाल दिमानी यांच्यासोबत त्यांनी रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशन कंपनीची स्थापना केली. या कंपनीच्या माध्यमातून पश्मिमी देशात अद्रक, हळद आणि इतर मसाले पाठविण्याचे काम सुरु केले. येत्या काळात पॉलिस्टर कपड्यांची मागणी वाढणार हे हेरुन त्यांनी यामध्ये नशीब आजमावण्याचा विचार केला.
माती विकून कमाई
धीरुभाई हाडाचे व्यावसायिक होते. त्यांना कोणत्या गोष्टीची कुठे गरज आहे, याचा अंदाज येत होता. अरबमधील एका शेखला गुलाबाची झाडं लावण्यासाठी खास प्रकारची माती हवी होती. ही गोष्ट कळताच धीरुभाईने त्याला भारतीय माती विक्री केली आणि त्यातून कमाई केली. मसाल्यानंतर धीरुभाईंनी टेक्सटाईल इंडस्ट्रीजमध्ये नशीब आजमावले. त्यांनी पॉलिस्टर कपड्यांचे उत्पादन आणि विक्री सुरु केली. त्यांनी पहिला ब्रँड Vimal सुरु केले.
तीन खुर्चींचे ऑफिस
त्यांनी नवीन कंपनी रिलायन्स कॉमर्स कॉर्पोरेशनसाठी मुंबईत 350 वर्ग फुटाचे कार्यालय भाडेतत्वावर घेतले. या कार्यालयात एक टेबल, तीन खुर्च्या, रायटिंग पॅड एवढ्याच वस्तू होत्या. 1966 मध्ये त्यांनी गुजरात राज्यात अहमदाबाद येथे एक कापड मिल सुरु केली. त्याचे नाव रिलायन्स टेक्सटाईल्स असे ठेवले. त्यांनी हळूहळू प्लास्टिक, मॅग्नम, पेट्रोकेमिकल, वीज उत्पादन सुरु केले. त्याचवेळी त्यांनी मुंबईत मोठे कार्यालय खरेदी केले.
रिलायन्सचे साम्राज्य
काही वर्षांच्या सततच्या परिश्रमानंतर त्यांनी मोठा कारभार वाढवला. 1977 मध्ये खऱ्या अर्थाने रिलायन्स इंडस्ट्रीजचा श्रीगणेशा झाला. तोपर्यंत अनेक प्रकल्प कार्यान्वीत झाले. उद्योगाचा पसारा, व्याप वाढला. त्यांनी त्याचवेळी आयपीओ बाजारात आणला. रिलायन्सचे साम्राज्य उभे राहिले. त्यांच्या मृत्यूनंतर दोन मुलांमध्ये वाटण्या झाल्या.