How Did Dastur Family Get Tata Surname: टाटा हे नाव आता देशातील प्रत्येक व्यक्तीला माहीत आहे. त्यामागे टाटा परिवारातील जमशेदजी टाटा यांच्यापासून रतन टाटा यांच्यापर्यंत अनेकांनी केलेले प्रयत्न आहे. फक्त उद्योग क्षेत्रात नाही तर सामाजिक क्षेत्रात टाटा यांचे योगदान मोठे आहे. टाटा समूहाचा विस्तार देशातच नाही विदेशातही झाला आहे. आज टाटा समुहाची नेट वर्थ 33 लाख कोटी आहे. जमशेदजी टाटा यांनी स्थापन केलेली ही कंपनी जगभरातील 150 पेक्षा जास्त देशांमध्ये आपली सेवा देत आहे. 3 मार्च 1839 रोजी गुजरातमध्ये जन्मलेले जमशेदजी टाटा हे टाटा समूहाचे संस्थापक म्हणून ओळखले जातात. परंतु त्यांचे टाटा हे नाव आधी दस्तूर होते. मग त्यांना टाटा हे नाव कसे मिळाले? यासंदर्भात अनेकांना माहिती नाही.
जमशेदजी टाटा यांचे जन्मस्थान नवसारी आहे. त्यांचा परिवार दस्तूर परिवार म्हणजे पुजारी आहे. राष्ट्रीय अल्पसंख्यक आयोगचे उपाध्यक्ष केरसी कैखुशरू देबू म्हणतात, पारसी लोक फारस येथून आले. नवसारीमध्ये त्यांची वस्ती झाली. पारसी समाजात फायर टेंपल (पारसी समाजाचे पूजाघर) मध्ये पूजा करणाऱ्यांना दस्तूर म्हटले जाते. जमशेदजी टाटा यांचे पूर्वज आधी दस्तूर होते. जमशेदजी यांनी वयाच्या 17 व्या वर्षी मुंबईतील एलफिंसटन कॉलेजमधून पदवी घेतली. त्यानंतर वडीलांच्या उद्योगात काम करु लागले. परंतु त्यांना मोठा उद्योग सुरु करायचा होता. त्यासाठी त्यांनी वडील नसरवानजी यांच्याकडून 21000 रुपये घेतले. त्या काळात ती मोठी रक्कम होती. त्याच पैशांमधून टाटा उद्योग समूह उभा राहिला.
टाटा हे नाव कुठून आले? यासंदर्भात केरसी कैखुशारू डेबू सांगतात की, टाटा घराण्याचे पूर्वज अतिशय तापट स्वभावाचे होते. गुजराथीमध्ये तापट स्वभावाच्या व्यक्तीला टाटा म्हणतात. तापट स्वभावाच्या व्यक्तीला सांगितले जाईल की त्याचा स्वभाव खूप टाटा आहे. त्यामुळे ते तापट स्वभावाचे असल्याने सर्व जण त्यांना टाटा म्हणत होते. पुढे त्यांचे आडनाव टाटा झाले.
पारशी समाजातील लोक विशेषत: दान आणि परोपकारासाठी ओळखले जातात. टाटा परिवारामध्ये ही परंपरा त्यांच्या पूर्वजांच्या काळापासून चालत आलेली आहे. जमशेटजी टाटा यांच्या काळापासून हा समूह देणगी आणि परोपकारात आघाडीवर आहे. देशातील सर्वात मोठी विज्ञान संस्था बंगळुरूमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, हे टाटा समूहाचे योगदान आहे. मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलही याच ग्रुपचे आहे.