नवी दिल्ली | 4 मार्च 2024 : अनंत अंबानी यांच्या प्री वेडिंग इव्हेंटचा सोहळा अत्यंत थाटात पार पडला. तब्बल तीन दिवस गुजरातचं जामनगर देशीविदेशी पाहुण्यांनी गजबजून गेलं होतं. जगभरातून जवळपास एक हजाराहून अधिक पाहुणे या सोहळ्याला आले होते. अमेरिकेची प्रसिद्ध गायिका रिहाना हिने सुद्धा आपला धमाकेदार परफॉर्मन्स सादर करून सोहळ्याला चार चांद लावले. तर मार्क झुकरबर्ग यांनी या सोहळ्यात हजेरी लावून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
हा सोहळा एवढा खास आणि नेत्रदीपक होता की अंबानी कुटुंबाशी संबंधित बातम्या खंगाळण्यास लोकांनी सुरुवात केली आहे. अंबानी यांचं साम्राज्य किती मोठं आहे? त्यांच्या कुटुंबात कोण कोण असतं? त्यांची लाइफस्टाईल कशी आहे? त्यांना कोणते पदार्थ आवडतात? इथपासून ते अंबानी कुटुंबीयांचे आवडते पर्यटनस्थळ कोणते? इथपर्यंतची माहिती या निमित्ताने घेतली जात आहे. आम्ही तुम्हाला अंबानी यांच्या व्यवसायाबाबतची माहिती देणार आहोत.
मुकेश अंबानी यांना दोन मुलं आणि एक मुलगी आहे. त्यांनी आपल्या तिन्ही मुलांमध्ये समसमान शेअर वाटले आहेत. धीरूभाई अंबानीसारखी चूक त्यांना करायची नव्हती. धीरूभाई यांच्या मृत्यूनंतर रिलायन्स ग्रुपमध्ये दोन गट पडले. रिलायन्स इंडस्ट्रीज मुकेश अंबानींकडे आली तर रिलायन्स कॅपिटल अनिल अंबानी यांच्याकडे आलं.
रिलायन्सच्या प्रमोटर्सकडे 50:30 टक्के भागीदारी आहे. तर बाकी 49.70 टक्के शेअर पब्लिककडे आहे. विशेष म्हणजे या 50.30 टक्के शेअरमधील हिस्सा अंबानी कुटुंबाकडे नाही. रिलायन्स इंडस्ट्रीत मुकेश अंबानी यांच्या वाट्याला फार थोडा हिस्सा आला आहे. त्यातील काही भागांचं त्यांनी आपल्या कुटुंबात बरोबरीने वाटप केलं आहे.
या कंपनीत अंबानी कुटुंबातील 6 लोकांकडे शेअर आहेत. मुकेश अंबानी, नीता अंबानी, आकाश, अनंत आणि ईशा अंबानी. तर मुकेश अंबानी यांची आई कोकिलाबेन धीरूभाई अंबानी यांच्याकडे सर्वाधिक शेअर आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, अंबानी यांनी आपल्या तिन्ही मुलांमध्ये एक समान 80,52,021 शेअरचं वाटप केलं आहे. तर कोकिलाबेन यांच्याकडे 1,57,41,322 शेअर आहेत म्हणजेच कोकिलाबेन यांचा कंपनीत 0.24% हिस्सा आहे.
यावेळी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या एका शेअरची किंमत 3,010 रुपये आहे. हा भाव 4 मार्च रोजीचा आहे. या कंपनीने गेल्या सहा महिन्यात 23 टक्के रिटर्न दिलं आहे. पाच वर्षाचा आकडा पाहिला तर या कंपनीचा आकडा 137 टक्क्याच्या पुढे गेला आहे. रिलायन्सचा टोटल मार्केट कॅप 20 लाख कोटी रुपयाहून अधिक आहे. भारतातील सर्वाधिक मोठी मार्केट कॅप असलेली ही कंपनी आहे. मुकेश अंबानी या कंपनीचे चेअरमन आहेत.