गृहकर्ज, कार लोन, मुलांचे शिक्षण, या खर्चांपासून कुठे तरी उसंत मिळावी, याचा विचार आपण सर्वसामान्य लोक करत असतो. आज आम्ही तुम्हाला दिलासा देणारीच बातमी देणार आहोत. तुमच्याकडे कार असेल तर तुम्ही टॅक्स डिस्काऊंट म्हणजेच कर सवलत मिळवू शकतात. याविषयी खाली विस्ताराने जाणून घ्या.
तुम्हाला माहिती आहे की, कार लोनकडे लक्झरी खर्च म्हणून पाहिलं जातं. यामुळे या लोनसाठी करसवलतीची तरतूद नसते. पण, तुम्ही डॉक्टर, इंजिनिअर, वकील किंवा इतर कोणत्याही व्यवसायाशी संबंधित असाल आणि व्यवसायासाठी आपल्या कारचा वापर करत असाल तर तुम्ही करात सूट मिळवू शकता. आता यासाठी नेमकं काय करावं लागेल, याविषयी खाली अगदी सोप्या पद्धतीने आम्ही सांगणार आहोत.
तुम्ही कारचा वापर व्यवसाय किंवा कोणत्याही प्रोफेशनल कारणांसाठी करत असाल तर कार लोनवरील व्याजावर टॅक्स डिस्काऊंट मिळवणं शक्य आहे. आता कर सवलतीत नेमका कशाचा समावेश होतो, हे जाणून घ्या.
तुम्ही ट्रॅव्हल एजन्सीचे मालक असाल किंवा तुमची कार भाड्याने देत असाल तर तुम्हाला कर विवरणपत्रात व्यवसायाची किंमत म्हणून व्याजाची रक्कम दाखवता येईल. तसेच वार्षिक इंधन खर्च आणि देखभाल खर्चाचाही कर सवलतीत समावेश करता येईल. डेप्रिसिएशन कॉस्ट म्हणजेच कारच्या किंमतीत कपात झाल्याचा दावाही डिस्काऊंटसाठी केला जाऊ शकतो. अवमूल्यन खर्च वार्षिक 15 ते 20 टक्क्यांपर्यंत असतो.
आता सोप्या भाषेत आणि अगदी सोप्या उदाहरणानं समजून घेऊया. असं गृहित धरा की तुमचं उत्पन्न 10 लाख रुपये आहे. आता तुम्ही कार लोनचे व्याज 70 हजार रुपये भरले असेल तर तुमचे टॅक्स कॅलक्युलेशन 9.30 लाख रुपये होईल. इंधन आणि देखभाल खर्चाबरोबरच कर सवलतीही अधिक असू शकतात.
गृहकर्जात थेट कर सवलत दिली जाते. तर कार लोन केवळ व्यावसायिक वापराच्या अटीवर करमुक्त असते. अशा प्रकारे तुम्ही योग्य कागदोपत्री पुरावे उपलब्ध असल्यास व्यावसायिक कारशी संबंधित खर्चाचे कर लाभांमध्ये रूपांतर करू शकतात.
एक गोष्ट लक्षात घ्या की, कर सवलतीचा दावा करताना कारचा वापर व्यवसायात होत असल्याचा पुरावाही देणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. खोटा दावा केल्यास प्राप्तिकर अधिकारी तो फेटाळून लावू शकतात आणि दंडही ठोठावू शकतात.