मुंबई : जर तुम्ही नोकरदार असाल तर तुमच्या पगारातील काही भाग EPF म्हणून कापला जातो. बहुतांश संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF)ची सुविधा उपलब्ध आहे. म्हणजेच, कंपनी पगारातून कापलेला भाग पीएफ (PF) खात्यात जमा करते, शेवटी तुम्हाला हवी तेव्हा ती रक्कम काढता येते. परंतु नोकरी बदलण्याच्या बाबतीत आपण अनेकदा पाहतो की नवीन संस्थेत नवीन पीएफ खातं उघडलं जातं.
कुठेही जाण्याची गरज नाही
जर तुम्ही तुमची सर्व रक्कम एकाच पीएफ खात्यात ट्रान्सफर (Transfer) करण्याचा विचार करत असाल, तर ही प्रक्रिया फारच सोपी आहे. यासाठी तुम्हाला कोणत्याही ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही. फक्त काही सोप्या टीप्स वापराव्या लागतील. वास्तविक, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) स्वतः कर्मचार्यांना ही सुविधा देते आणि त्यांच्यावतीनं कर्मचार्यांना त्याच्या टीप्सही सांगण्यात येतात, जेणेकरून सहज ईपीएफ हस्तांतरण करता येईल.
ईपीएफ हस्तांतरित करण्याची प्रक्रिया –
01 : EPF हस्तांतरित करण्यासाठी, प्रथम तुम्हाला EPFO पोर्टल https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ला भेट द्यावी लागेल. यानंतर, कर्मचाऱ्याला त्याचा UAN क्रमांक म्हणजेच युनिव्हर्सल अकाउंट नंबर आणि पासवर्डच्या मदतीनं लॉग इन करावं लागेल.
02 : यानंतर, या वेबसाइटवर तुम्हाला ‘ऑनलाइन सर्व्हिसेस’चा पर्याय दिसेल, यामध्ये तुम्हाला ‘एक सदस्य-एक ईपीएफ खातं (ट्रान्सफर रिक्वेस्ट)’ या पर्यायावर क्लिक करावं लागेल.
03 : तुम्ही एक सदस्य वन ईपीएफ खात्यावर क्लिक करताच, त्यानंतर तुम्हाला वैयक्तिक माहिती आणि पीएफ खातं व्हेरिफाय करावं लागेल. यामध्ये तुम्हाला तुमच्या सध्याच्या नोकरीसंबंधीची माहिती द्यावी लागेल.
04 : या प्रक्रियेनंतर तुम्हाला ‘गेट डिटेल्स’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल, त्यानंतर तुम्हाला जुन्या कंपनीशी संबंधित माहिती दिसेल.
05 : तुम्हाला प्रमाणित फॉर्मसाठी जुना एम्प्लॉयर किंवा सध्याचा एम्प्लॉयर यापैकी एक निवडावा लागेल.
06 : यानंतर, तुम्ही ‘Get OTP’ पर्यायावर क्लिक करताच, तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक OTP मिळेल. तो तुम्हाला इथं सबमिट करावा लागेल. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, ईपीएफ ट्रान्सफर होईल.
अधिकृत ट्विटरवर माहिती
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने (EPFO)नं स्वत: त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्याद्वारे संपूर्ण प्रक्रिया स्पष्ट केलीय, जेणेकरून आवश्यक असल्यास कोणताही कर्मचारी या स्टेप्सद्वारे सहजपणे EPF हस्तांतरित करू शकेल.