देशातील प्रमुख खासगी बँक ICICI ने 17,000 क्रेडिट कार्ड ब्लॉक केली. ग्राहकांच्या डेटा संदर्भातील सुरक्षेच्या कारणावरुन हा निर्णय घेण्यात आला. त्यात बँकेला काही त्रुटी आढळल्याने क्रेडिट कार्ड बंद करुन नवीन कार्ड या ग्राहकांना देण्यात येतील. तात्काळ प्रभावाने याची अंमलबजावणी करण्यात आली. ब्लॉक करण्यात आलेले क्रेडिट कार्ड एकूण क्रेडिट कार्डच्या 0.1 टक्के इतके आहेत.
बँकेने चूक केली मान्य
बँकेने क्रेडिट कार्ड ब्लॉक करण्याच्या मागील कारण ही दिले. या कार्डचा डेटा लीक झाला होता. म्हणजे ग्राहकांचा तपशील चुकीच्या लोकांच्या हातात गेल्याचे समोर आले होते. गेल्या काही दिवसांत देण्यात आलेल्या क्रेडिट कार्डपैकी काहींसोबत हा प्रकार समोर आल्यानंतर तातडीने 17 हजार क्रेडिट कार्ड बंद करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. चुकीने बँकेच्या डिजिटल चॅनलमध्ये चुकीचे युझर्स आल्याचे समोर आले होते.
iMobile Pay ॲपने घातला गोंधळ
आयसीआयसीआय बँकेच्या काही ग्राहकांनी सोशल मीडियावर या ॲपसंबंधी काही शंका शेअर केल्या. त्यानुसार, या ॲपमध्ये ग्राहकांच्या क्रेडिट कार्ड आणि CVV ची माहिती दिसत होती. इतकंच काय या कार्डच्या तपशीलात सहज मिळवता येऊ शकत होता. कोणत्याही व्यक्तीच्या पेमेंट ॲपवर सहज पोहचता येऊ शकत होतं. ओटीपी शिवाय पेमेंटीची शक्यता होती.
बँक देणार नुकसान भरपाई
अजून या क्रेडिट कार्ड अथवा ॲपचा दुरुपयोग झाल्याचे प्रकरण समोर आलेले नाही. पण तसे झाल्यास अथवा त्यामुळे प्रभावित ग्राहकांना आर्थिक नुकसान भरपाई देण्याचे बँकेने मान्य केले आहे. टेक्नोफिनोवर एका युझर्सने अनुभव कथन केला आहे. त्यानुसार तो एका ग्राहकाच्या iMobile ॲपच्या माध्यमातून ॲमेझॉन पे क्रेडिट कार्डचा तपशील मिळवू शकत होता. ओटीपीशिवाय आंतरराष्ट्रीय पेमेंट होऊ शकत असल्याचा दावा त्याने केला.
कोटक महिंद्राला दणका
RBI ने ग्राहकांचा डेटा लिक प्रकरणात कोटक महिंद्रा बँकेला नुकताच दणका दिला. बँकिंग नियमन कायदा 1949 च्या कलम 35A अंतर्गत कोटक महिंद्रा बँकेवर ही कारवाई केली आहे. त्यानुसार, कोटक महिंद्रा बँकेला ऑनलाईन नवीन ग्राहक तसेच मोबाईल बँकिंगद्वारे कोणतेही नवीन ग्राहक जोडणी आणि नवीन क्रेडिट कार्ड वाटप यावर निर्बंध आले आहेत. पण बँकेचे इतर दैनंदिन व्यवहार आणि प्रक्रिया सुरळीत असतील, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे.