मुंबई : संपूर्ण जगभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. भारतात कोरोनामुळे प्रचंड नुकसान (COVID 19 Effect) झालं. अनेक उद्योगधंदे बंद पडले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे त्याचा फटका अर्थव्यवस्थेला पडला. कोरोना काळात भारताचा डेट-जीडीपी रेश्यो हा चक्क 74 टक्क्यांवरुन थेट 90 टक्क्यांवर पोहोचल, अशी माहिती इंटरनॅशनल मॉनेटरी फंडने दिली आहे. पण येत्या काही काळात परिस्थिती सुधारली तर हा रेट 80 टक्क्यांवर येण्याची शक्यता आहे, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.
डेट-जीडीपी रेश्यो म्हणजे नेमकं काय?
कोणत्याही देशाची कर्ज परतफेड करण्याची क्षमता नेमकी किती आहे त्याचं मोजमाप डेट-जीडीपीच्या आधारावर केलं जातं. एखाद्या देशाचा डेट-जीडीपी रेश्यो जितका जास्त असतो तितकं त्या देशाची कर्जाची परतफेड करण्याची क्षमता कमी असते, असं मानलं जातं. डेट-जीडीपी रेश्यो वाढल्यास डिफॉल्टची शक्यता देखील वाढते (COVID 19 Effect).
इंटरनॅशनल मॉनेटरी फंडने (आयएमएफ) भारतातील परिस्थितीबाबत नेमकं काय सांगितलं?
आयएमएफचे अधिकारी पाओलो मौरा यांनी या विषयावर आपलं मत मांडलं आहे. भारतात कोरोना संकटाआधी 2019 वर्षाच्या अखेरीस डेट जीडीपी रेश्यो हा 74 टक्के होता. मात्र, 2020 च्या अखेरिस हा रेश्यो थेट 90 टक्क्यांवर पोहोचला. ही खूप मोठी वाढ आहे. मात्र, जगभरातील अनेक मोठमोठ्या अर्थव्यवस्थांची देखील हीच अवस्था आहे, अशी प्रतिक्रिया पाओलो यांनी दिली.
भारतात आता हळूहळू परिस्थिती सुधारेल अशी आशा आहे. येत्या काळात भारताची अर्थव्यवस्था सुधारण्याची शक्यता आहे. त्यामुळे डेट जीडीपी रेश्यो हा 80 टक्क्यांवर येण्याचा अंदाज आहे, असं पाओलो यांनी सांगितलं. तसेच भारतात सर्वात आधी सर्वसामान्य कामगार आणि कंपन्यांची मदत करणं जास्त जरुरीचं आहे. विशेषत: गरिब, होतकरु वर्गाला सर्वाधिक मदतीची जास्त आवश्यकता आहे. तसेच भारताच्या येत्या अर्थसंकल्पात याबाबत विचार केला जाऊ शकतो, असंही त्यांनी म्हटलं.
दुसऱ्या महायुद्धानंतर सर्वात भयानक जागतिक मंदी
आयएमएफच्या अधिकारी क्रिस्टालिना जॉर्जीवा यांनी देखील या विषयावर आपली भूमिका मांडली. दुसऱ्या महायुद्धानंतर जगात जशी आर्थिक मंदी आली होती तशीच मंदी आता जगभरातील लोक सोसत आहेत. पुढच्या काही दिवसांमध्ये परिस्थिती सुधारेल अशी आशा आहे. कारण लाखो लोकांना वॅक्सीनेशनमुळे फायदा मिळत आहे, असं जॉर्जीवा म्हणाल्या. आयएमएफ आणि जागतिक बँकेच्या वार्षिक कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
हेही वाचा : सोन्याच्या किंमती वधारल्या, ऐन लग्नसराईत सोने 50 हजारांचा टप्पा गाठण्याची शक्यता, वाचा आजचे दर…