नवी दिल्ली | 15 ऑगस्ट 2023 : आज भारतीय 77 वा स्वातंत्र्य दिन (Independence day 2023) साजरा करत आहे. भारतीय स्वातंत्र्याला 76 वर्षे पूर्ण झाली आहेत. देश 77वा स्वातंत्र्य दिन उत्साहाने साजरा करत आहे. या 76 वर्षांत सर्वच स्तरावर मोठा बदल झाला आहे. आधुनिक भारतापर्यंतचा मोठा पल्ला गाठला गेला आहे. अनेक क्षेत्रात भारताने दैदिप्यमान कामगिरी केली आहे. ज्या वस्तू पूर्वी अवघ्या काही पैशात खरेदी करता येत होत्या. त्या वस्तू आता 100 रुपयांना सुद्धा येत नाहीत. या काळात महागाईने मोठा पल्ला गाठला आहे. गावातील पारावर अथवा घरातील ज्येष्ठ मंडळी त्या काळातील वस्तूंच्या किंमती, स्वस्ताई आपल्याला सांगतात. त्यावेळी आपल्याला आश्चर्य वाटते. त्यावेळी काही वस्तूंचे भाव खूप स्वस्त होते. आजच्या सारखी महागाई त्यावेळी नव्हती. अन्नधान्याच्या किंमती, तेलाच्या किंमती (Edible Oil Price) जमिनीवरच होत्या. गेल्या दहा वर्षांत या किंमतींनी मोठा उच्चांक गाठला आहे.
4 रुपयांमध्ये डॉलर
स्वातंत्र्य काळात 1947 मध्ये एक डॉलरची किंमत 4 रुपयांपेक्षा पण कमी होती. आज एका डॉलरची किंमत 83 रुपयांच्या घरात आहे. स्वातंत्र्याच्या 76 वर्षांमध्ये भारतीय रुपयाची किंमत जवळपास 20 पट घसरली आहे. रुपयाचे अवमूल्यन, व्यापारातील असमतोलपणा, वित्तीय तूट, महागाई, कच्चा तेलाचे वाढलेले भाव, आर्थिक संकट आणि इतर अनेक कारणांनी डॉलरचे तुलनेत रुपयामध्ये मोठी घसरण झाली.
665 पट वाढले सोने
स्वातंत्र्यानंतर सोन्याचा भाव 665 पट वाढले. त्यावेळी पूर्वजांनी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केले असते तर आज तुम्ही मालामाल झाले असता. स्वातंत्र्य काळात सोन्याचा 88.62 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर आज 10 ग्रॅम सोन्यासाठी जवळपास 59,000 रुपये मोजावे लागतात. सोन्याने आतापर्यंत ग्राहकांना 66,475 टक्के रिटर्न दिला आहे.
25 पैशांमध्ये एक लिटर पेट्रोल
1947 मध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमती अत्यंत कमी होत्या. त्यावेळी पेट्रोल 25 पैसे प्रति लिटर होते. आज पेट्रोलचा भाव देशातील शहरानुसार वेगवेगळा आहे. काही ठिकाणी पेट्रोल 100 रुपयांच्या जवळपास तर काही ठिकाणी त्यापेक्षा महाग आहे. डिझेलचा भाव पण वाढला आहे.
इतर वस्तूंचे काय आहे भाव
1947 मध्ये तांदळाचे भाव कमी होते. 12 पैसे प्रति किलो असा भाव होता. आज हाच भाव 40 ते 45 रुपये आणि बासमती व इतर तांदळाचा भाव जास्त आहे. बटाट्याचा भाव त्यावेळी 25 पैसे किलो होता. आता एक किलो बटाट्यासाठी 30 रुपये मोजावे लागत आहेत. त्यावेळी सायकल 20 रुपयांमध्ये मिळत होती. आज सायकल 5 हजारांच्या पुढेच मिळते. त्यातही अनेक प्रकार आले आहेत. त्यानुसार भावात तफावत दिसून येते. दिल्ली ते मुंबई हा विमान प्रवास 140 रुपयात होत होता. आता त्यासाठी 7 हजार रुपयांचे भाडे मोजावे लागते.