नवी दिल्ली : गेल्या दोन वर्षांपासून जगावर कोरोनाचे संकट होते. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली होती. मात्र आता जगावरील कोरोनाचे सावट हळूहळू कमी होताना दिसत आहे. कोरोना रुग्ण कमी झाले असून, लसीकरणाला देखील वेग आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा उद्योगधंदे नव्या जोमाने सुरू झाले आहेत. लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्याने अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळाली आहे. कोरोनाच्या सावटातून बाहेर पडून ज्या देशांच्या अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्याप्रमाणात सुधारणा झाली, अशा काही निवडक देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे. तसेच दिलासादायक गोष्ट म्हणजे भारतामध्ये कोरोना लसीकरणाचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्यामुळे, कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनचा देखील देशाला फारसा धोका नसल्याचे आरोग्य तज्ज्ञांनी म्हटले आहे.
अर्थ मंत्रालयाने मासिक अहवालात सादर केलेल्या आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत भारताचा जीडीपी (GDP) हा 8.4 टक्के इतका राहिला आहे. याचाच अर्थ मागील आर्थिक वर्षांच्या तुलनेत अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्याप्रमाणात सुधारणा झाली आहे. देशाचा जीडीपी चालू तिमाहित कोरोनापूर्व काळाच्या जवळपास पोहोचला आहे. या अहवालात असे म्हटले आहे की, देश हळूहळू कोरोनाच्या संकटामधून बाहेर येत असून, अर्थव्यवस्थेच्या वृद्धीसाठी हे सकारात्मक संकेत आहेत. ज्या देशांनी कोरोनाच्या संकटातून बाहेर पडत, आपल्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचा प्रयत्न केला, अशा काही निवडक देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे. लॉकडाऊननंतर कृषी, आयटी आणि इतर सेवा सेत्रांमध्ये तेजी आली असल्याचे देखील या अहवालामध्ये म्हटले आहे.
कोरोना लसीकरण हे भारतातील उद्योगांसाठी संजिवनी ठरले आहे. ज्या प्रमाणात लसीकरणाचा वेग वाढला त्याचप्रमाणात उद्योगांनी देखील गती घेतली. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीपासून उद्योग पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहेत. त्याचा परिणाम हा आपल्याला दुसऱ्या तिमाहीमध्ये पहायला मिळत आहे. देशाचा जी़डीपी चालू तिमाहीत 8.4 टक्क्यांवर पोहोचला असल्याचे या अहवालात म्हटले आहे, दरम्यान एप्रिलपर्यंत जीडीपी 9 टक्क्यांच्या आसपास पोहोचू शकतो असा अंदाज भारतीय रिझर्व्ह बँकेकडून वर्तवण्यात आला आहे.
पूर्व-मध्य रेल्वे मालामाल; प्रवाशांची संख्या दुपटीने वाढली, उत्पन्नात 49 टक्क्यांची वाढ
Edible Oil Price : खाद्यतेलाच्या किंमती कमी होणार? वाचा, उद्योगविश्वानं व्यक्त केलेला अंदाज