रशिया व युक्रेन यांच्यातील तणाव (russia ukraine conflict) दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. याचा परिणाम आंरराष्ट्रीय बाजारावर पडणार नाही तरच नवलं. जगभरातील शेअरमार्केटची पडझड, वाढते सोन्याचे दर तसेच कच्च्या तेलाच्य किमतीने संपूर्ण जगावर महागाईचे संकट निर्माण झाले आहे. याचा सर्वाधिक फटका भारताला बसताना दिसत आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने त्याचा परिणाम सामान्यांवर होणार आहे. भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयातदार देश आहे. आपल्या गरजेच्या 85 टक्के तेल आपण आयात (Import) करतो. अशा परिस्थितीत महागडे कच्चे तेल (crude oil price) भारताचे आयात शुल्क वाढवून व्यापारातील तूट वाढवू शकते. सद्य:स्थितीला सामोरे जाण्यासाठी सरकारने राष्ट्रीय तेल स्टॉकमधून अधिकचे तेल काढण्याचा निर्णय घेतला आहे. नोव्हेंबरमध्ये सरकारने तेल साठ्यातून 5 दशलक्ष बॅरल तेल काढण्याचा निर्णय घेतला होता. यातून आतापर्यंत 3.5 दशलक्ष बॅरल तेल काढण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून युक्रेन व रशिया यांच्यातील संघर्षांमुळे संपूर्ण जगाचे डोळे त्यांच्याकडे लागले आहेत. या तणावामुळे तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. गुरुवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले की, जगातील इतर देशांसह अमेरिका कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होण्यावर लक्ष ठेवून आहे. वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर जागतिक धोरणात्मक क्रूड रिझर्व्हमधून अतिरिक्त तेल काढण्याचा विचार केला जात आहे. दरम्यान, आयईए सदस्यांनीही तेल साठ्यांच्या वापरावर सहमती दर्शवली आहे. जपान आणि ऑस्ट्रेलियानेही त्यांच्या तेलाचा साठा वापरण्याचे मान्य केले आहे. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी (IEA) च्या सदस्यांनी सांगितले की, जर युक्रेनच्या संकटामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या तर ते आपला तेलाचा साठा वापरणार आहेत.
फेब्रुवारीमध्ये इंडियन क्रूड ऑइल बास्केटसाठी सरासरी किंमत प्रति बॅरल 93 डॉलर होती. हे जानेवारीच्या तुलनेत 10 टक्के अधिक आहे. जानेवारीत सरासरी किंमत प्रतिबॅरल 84.2 डॉलर होती. कच्च्या तेलाच्या किमतीत 19 डॉलरने वाढ झाली आहे, पण गेल्या तीन महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झालेला नाही. कच्च्या तेलाने 8 वर्षांनंतर 100 डॉलरचा टप्पा पार केला असून 4 सप्टेंबर 2014 नंतर पहिल्यादा 24 फेब्रुवारी रोजी भारताला 100 डॉलरच्या दराने कच्चे तेल खरेदी करावे लागले. रशिया हा जगातील दुसरा सर्वात मोठा तेल निर्यातदार आणि तिसरा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. रशिया दररोज 5 दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाची निर्यात करतो. 48 टक्के युरोप आणि 42 टक्के आशियाई देश रशियावर अवलंबून आहेत. त्यामुळे रशियाकडून होणाऱ्या आयातीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. सध्या जगातील सर्वात मोठा तेल निर्यातदार सौदी देशही रशियाच्या पाठीशी उभा असल्याचे दिसत आहे.
रशिया-युक्रेन युद्धाचा खाद्यतेलाच्या आयातीला फटका; तेलाचे दर वाढणार?
डाळीच्या ठोक भावात घसरण सुरूच, गेल्या वर्षभरात उडीद डाळीच्या दरात 5 टक्क्यांची घट
IPO मध्ये गुंतवणूक करायचीये? तर मग त्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात घ्या