भारतातील दिग्गज उद्योगपती गौतम अदानी यांनी अल्पवधीतच आपल्या उद्योगाचे साम्राज्य वाढवले आहे. त्यांनी देशातच नाही तर परदेशातील अनेक प्रकल्प सुरु केले आहेत. आता गौतम अदानी यांची नजर हिमालय असलेल्या भूतान या देशाकडे आहे. गौतम अदानी भारताचा शेजारील देश भूतानमध्ये गेलेफू माइंडफुलनेस सिटीममध्ये गुंतवणूक करण्याची संधी शोधत आहे. भूतान आपल्या दक्षिणी सीमा भागात एक टाउनशिप प्रकल्प सुरु करत आहेत. त्या प्रकल्पावर अदानी समूहाचे लक्ष राहिले आहे.
ब्लूमबर्गच्या रिपोर्टमध्ये भूतानमधील प्रकल्पाचा उल्लेख करत अदानी समूहाकडून सुरु असलेल्या हालचालींची माहिती दिली आहे. या प्रकल्पाबाबत गेलेफूचे गव्हर्नर लोटे शेरिंग यांनी सांगितले की, भूतान-भारत सीमा रेषेजवळ 1,000 वर्ग किलोमीटरवर टाउनशिप प्रोजेक्टचे काम सुरु आहे. या प्रकल्पात सोलर आणि हायड्रोपॉवर प्लॅट निर्माण करण्यासाठी अदानी समूहासोबत चर्चा सुरु आहे.
भूतान सरकारने रिन्यूएबल एनर्जी प्रोजेक्ट्स सुरु करण्यासाठी या भागातील अनेक प्रकल्प पाहिले. 20 गीगावॅट क्षमतेचा प्रकल्प उभा करण्यासाठी एक कायमस्वरुपी उर्जा उत्पादन केंद्र बनवण्यात येणार आहे. त्याठिकाणी रस्ते बनवणे, इतर पायाभूत सुविधा निर्माण करणे आदी कामेही करण्यात येणार आहे. त्यासाठी आशियामधील दिग्गजांना गुंतवणुकीसाठी आकर्षित करत असल्याचे गेलेफू गव्हर्नर लोटे शेरिंग यांनी सांगितले. एनर्जी प्रोजेक्ट्स आणि हायड्रोपॉवर प्रोजेक्ट्ससोबत एक आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि एक बंदर निर्माण करण्यासाठी बोलणी सुरु आहे.
अदानी ग्रुपसोबत भूतान सरकारची डील झाली तर शेजारील देशांमध्ये अदानी यांचा दबदबा वाढणार आहे. अदानी ग्रुपने यापूर्वीच इस्त्रायल, केनिया, श्रीलंका, बांगलादेश, व्हिएतनाममध्ये आपले प्रकल्प सुरु केले आहेत. भारतातील रिलायन्स उद्योग समूह जगभरात पसरला आहे. अनेक देशांमध्ये रिलायन्सच्या कंपन्या आहेत. त्यानंतर आता अदानी समूहसुद्ध देशाबाहेर आपल्या प्रकल्पांचा विस्तार करत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये अदानी समूहाची वेगाने भरभराट झाली आहे.