नवी दिल्ली: महागाईने देशात पुन्हा डोके वरं केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या दरात वाढ झाली आहे. तर त्यावर देशातंर्गत केंद्र आणि राज्य सरकारने भरमसाठ कर बसविला आहे. त्याचा परिणाम सर्वच क्षेत्रावर दिसून येत आहे. डिझेलच्या किंमती वाढल्याने दळणवळण महागले आहे. परिणामी वस्तू, भाजीपाला आणि किराणा महागला आहे. देशाचा वार्षिक घाऊक महागाई दराने (Inflation Rate) कळस गाठला आहे. डिसेंबर महिन्यात महागाई दर 5.59% वर गेला आहे, जो त्याच्या मागील महिन्यात 4.91% होता, उत्पादन केलेल्या वस्तूंच्या वाढत्या किंमतींमुळे (Manufactured Products) महागाई वाढल्याचे सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीवरुन स्पष्ट झाले.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO) ने बुधवारी महागाई दराची आकडेवारी जाहीर केली. त्यामध्ये डिसेंबर 2021 महिन्यात अन्नधान्य महागाईत वाढ नोंदविल्याचे स्पष्ट केले. डिसेंबरमध्ये महागाई दर 5.59 टक्क्यांवर गेला. औद्योगिक उत्पादन निर्देशांकानुसार (IIP) भारतातील कारखान्याच्या उत्पादनातही नोव्हेंबरमध्ये 1.4 टक्क्यांची वाढ झाली असून, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने (MoSPI) जाहीर केलेल्या दोन स्वतंत्र आकडेवारीत ही बाब समोर आली.
नोव्हेंबर 2021 मध्ये ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) आधारित किरकोळ महागाई 4.91 टक्के आणि डिसेंबर 2020 मध्ये 4.59 टक्के होती. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, या आर्थिक वर्षात डिसेंबरमध्ये अन्नधान्य चलनवाढीचा दर 4.05 टक्क्यांपर्यंत वाढला आहे, तर मागील महिन्यात तो 1.87 टक्के होता.
भारतीय रिझर्व्ह बँकेचे पतधोरण वास्ताविक महागाई दरावर अवलंबून असते. मागील काही दिवसांपासून महागाई दरात सातत्याने वाढ होत असल्याने रिझर्व्ह बँकेने पतधोरणात बदल न करता व्याजदर जैसे थे ठेवले होते. मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या किंमती भडकल्याने जीवनावश्यक वस्तूंसह सर्वच दरात सातत्याने वाढ झाली आहे. पेट्रोल, डिझेल, सीएनजीमध्ये कमालीची वाढ झाली आहे. वाहतूक खर्चात वाढीचा परिणाम सर्वच क्षेत्रावर तात्काळ दिसून आला. त्यामुळे अन्नधान्याच्या किंमतीत भरमसाठ वाढ झाल्याने त्याचा मोठा परिणाम महागाई दरावर दिसून आला आहे.
संबंधित बातम्या :
भविष्यात भारताचा आर्थिक विकास दर सर्वाधिक असेल; महागाई नियंत्रणासाठी आरबीआयकडून प्रयत्न – गोयल
नव्या वर्षात जीएसटीमध्ये वाढ; ‘या’ वस्तू महागणार, ग्राहकांना बसणार आर्थिक झळ