गेल्या काही दिवसांपासून इंधन, स्वयंपाकांचा गॅसचे दर वाढून गगनाला भिडले आहेत. महागाईमुळे देशभरातील सर्वसामान्य नागरिक हैराण झाले असून महागाईचा फटका सर्वच राज्यांना बसला आहे. जून महिन्यात घाऊक मूल्यावर आधारित महागाईचा दर (Wholesale Inflation June 2022) 15.18 टक्के इतका आहे. होलसेल बाजारातील दराचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर दिसून येतो. त्यांच्या बजेटला फटका बसू शकतो. दरम्यान भारतात किरकोळ महागाई दरात घसरण झाली असून तेलंगणामध्ये किरकोळ बाजारातील महागाई दर (Retail Market Inflation) सर्वाधिक 10.1 टक्के इतका असून महाराष्ट्रात (Maharashtra News) हा दर 8.0 टक्के आहे. तर मणिपूरमध्ये हा दर सर्वात कमी, म्हणजे 0.6 टक्के आहे. ताज्या आकडेवारीनुसार जून महिन्यात घाऊक महागाईचा दर 15.18 टक्के राहिला आहे. मे महिन्याच्या तुलनेत हा आकडा कमी आहे. मे महिन्यात हा आकडा 15.88 होता . वर्षभराची तुलना केल्यास हा आकडा मोठा आहे.
जून 2021मध्ये घाऊक महागाई दर 12.07 टक्के होता. सलग तिसऱ्या महिन्यात घाऊक महागाई दर 15 टक्क्यावर गेला आहे. एप्रिल 2022मध्ये घाऊक महागाई दर वाढून 15.08 वर पोहोचला आहे. त्यानंतर मे महिन्यात घाऊक महागाई दराने नवा विक्रम प्रस्थापित केला. मात्र जून महिन्यात आकडा थोडा घसरला. 1998नंतर पहिल्यांदाच घाऊक महागाई दर 15 टक्क्याच्यावर गेला आहे. यापूर्वी डिसेंबर 1998मध्ये घाऊक महागाई दर 15 टक्क्यांच्यावर गेला होता.
भारतात किरकोळ महागाई दरात घसरण झाली आहे. जूनमध्ये किरकोळ महागाई दर 7.01 टक्के राहिला आहे. मे महिन्यापेक्षा हा दर 0.3 टक्क्याने कमी आहे. मेमध्ये किरकोळ महागाई दर 7.04 टक्के होता. तथापि, किरकोळ महागाई दर सलग सहा महिन्यांपासून भारतीय रिझर्व्ह बँकेच्या टार्गेटच्या अधिक आहे.
एप्रिल महिन्यात किरकोळ महागाई दर 7.79 टक्के होता. किरकोळ महागाई दर पाहूनच रिझर्व्ह बँकेकडून धोरण आखली जातात. जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेत जून महिन्यात महागाई दर वाढून 9.1 टक्क्यावर पोहोचली आहे. गेल्या 41 वर्षातील हा सर्वात मोठा दर असल्याचं सांगितलं जात आहे.