नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून देशातील इंधन दरवाढ हा चर्चेचा मुद्दा असताना आता सामान्य लोकांच्या चिंतेत भर टाकणारी आणखी एक गोष्ट समोर आली आहे. देशातील महागाईने (Inflation Index) आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढत नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून कोरोना (Coronavirus) आणि लॉकडाऊनमुळे अगोदरच मेटाकुटीस आलेल्या सामान्य लोकांचे कंबरडे आणखी मोडणार आहे. (Wholesale price Index hits record new level in May 2021)
घाऊक मूल्यावर आधारित महागाई दर मे महिन्यात 12.14 टक्के इतका रेकॉर्ड स्तरावर गेला आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी याच महिन्यात महागाई दर उणे 3.37 टक्के होता. मे महिन्यातील घाऊक तसेच किरकोळ असे दोन्ही प्रमुख निर्देशांक विक्रमी टप्प्यावर पोहोचले आहेत.
यंदा इंधन दरवाढ हे महागाईचे प्रमुख कारण ठरले आहे. घाऊक निर्देशंकात इंधन दरवाढीचा वाटा गेल्यावर्षीच्या तुलनेत दुप्पट म्हणजे 37.61 इतका आहे. तर अन्नधान्याच्या महागाईचा दरही 4.31 टक्के इतका झाला आहे. जून महिन्यात महागाईचा दर किंचित घसरुन 12 टक्क्यांच्या आसपास स्थिरावेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
सध्या खाद्यतेलाच्या किमतीतील वाढीने सामान्यांच्या मासिक खर्चाचा ताळमेळ बिघडला आहे. भारताकडून 70 टक्के खाद्यतेल आयात केले जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावर खाद्यतेलाच्या वाढलेल्या किंमतीचा परिणाम भारतीय बाजारपेठेत पाहायला मिळत आहे. तुर्तास तरी या दरवाढीपासून दिलासा मिळण्याचे संकेत दिसत नाहीत.
संबंधित बातम्या:
मोहरीचे विक्रमी उत्पादन होऊनही खाद्यतेल महागच, आणखी वाढ होण्याची शक्यता
पेट्रोल-डिझेलचं ‘शतक’, मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणतात सरकारला अधिकचे पैसे पाहिजे म्हणून जास्तीचा कर
(Wholesale price Index hits record new level in May 2021)