बुलडणा : बुलडाण्यातील 25 उर्दू शाळांनी गोवर आणि रुबेला लस घेण्यास नकार दिल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्याचे कारणही तसेच आहे. या लसींमुळे मुस्लीम समाजाला नपुंसक बनवण्याचा भाजप-संघाचा डाव असून, ही लस आपल्या मुलांना देऊ नये, अशी अफवा पसरवणारा व्हिडीओ बुलडाण्यातील मुस्लिम वस्तीत सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओच्या अफवेमुळे मुस्लिम बहुल भागातील नागरिकांनी ही लस त्यांच्या पाल्यांना देण्यास नकार दिला आहे.
देशभर गोवर, रुबेला लस देण्याची मोहीम राबवली जात आहे. मात्र बुलडाणा जिल्ह्यातील काही उर्दू शाळांनी ही लस त्यांच्या पाल्यांना देण्यास नकार दिला आहे. तसे स्वतः पालकांनी शाळेत येऊनही शिक्षकांना सांगितले आहे. त्यामुळे लसीकरण करणारे डॉकटर त्या उर्दू शाळेतून परतताना दिसत आहे.
गोवर, रुबेला लस घेतल्यामुळे नपुंसकत्व येते आणि आपल्या मुस्लीम समाजाला नपुंसक करण्याचा हा कट आहे, अशा आशयाचा हा व्हिडीओ संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यातील मुस्लीमबहुल वस्तीत व्हायरल झाला आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून जिल्हा आरोग्य यंत्रणेचे पथक ज्या मुस्लीम शाळेत ही लस देण्यासाठी जात आहे. त्या मुस्लीम शाळांचा नकार येत आहे. याची माहिती शाळांनी आरोग्य विभागाली दिली आहे.
बुलडाण्यातील मलकापूरमधील 18 शाळा, चिखली, खामगावातील दोन शाळा अशा प्रत्येक तालुक्यातील एक-दोन मुस्लीम शाळांचा गोवार आणि रुबेला लसीकरणासाठी नकार आल्याची माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. लसीच्या नकाराचे कारण जाणून घेतले असता एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असलयाचे समोर आले असून, त्यात या लसीमुळे नंपुसकत्व, अंधत्व आणि मुलींना मुले होत नाहीत, असे सांगितले गेले आहे.
आरोग्य यंत्रणेने सतर्क होत हा आरोप खोडून काढण्यासाठी उच्च शिक्षित मुस्लिमांच्या बैठका घेवून त्यांना लसीचे महत्व पटवून देत आहेत. अफवांवर कुणी मुस्लीम बांधवांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहनही जिल्हा आरोग्य विभागाने केला आहे.
आता मुस्लीमबहुल भागातील लोकांना गोवर, रुबेला लसीकरणाचं महत्त्व पटवून देण्याचं जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासमोर आव्हान आहे, तर या लसीकरणाबाबत अफवा पसरवणाऱ्या समाजकंटकाला पकडण्याचं आव्हान बुलडाणा पोलिसांसमोर आहे.