नवी दिल्ली : विहित मुदतीत आणि बिनचूक आयकर विवरण भरणे महत्वाचे ठरते. करपात्र उत्पन्न गटातील व्यक्तींना यासाठी अलर्ट राहावे लागते. आयकर विभागाच्या (Income Tax Department) सूचनांकडे बारकाईने लक्ष ठेवावे लागते. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर डिस्क एररमुळे (disk error) आयकर विवरण भरण्यास अडचणींचा सामना कराव्या (ITR Filing Issues) लागल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. आयकर विभागाने थेट तक्रारकर्त्यांशी संपर्क साधला. व्हिडिओ कॉलद्वारे तक्रारकर्त्यांच्या शंकांचे समाधान केले. आयकर विभागाच्या कॉल सेंटरला दिवसाला 9000 कॉल प्राप्त होत असल्याची माहिती आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच कॉलद्वारे संपर्कात न येणाऱ्या व्यक्तींच्या शंकांचे सोशल मीडियाच्या माध्यमातून निराकरण केले जात असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
आघाडीची माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी इन्फोसिसने आयकर विभागाच्या नव्या वेबसाईटची निर्मिती केली आहे. नवीन वेबसाईट लॉंच केल्यानंतर विविध प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागला होता. इन्फोसिसने त्वरित त्रूटींवर काम करून निराकरण केले. सध्या 75-100 जणांची वॉर रुम बनविण्यात आली आहे. आयटी क्षेत्रासोबत आयकर तज्ज्ञ या टीममध्ये समाविष्ट आहेत. 24×7 वॉर रुम कार्यरत असून करदात्यांच्या शंकांचे निराकरण केले जात आहे.
आयकर विवरण दाखल करण्यासाठी अंतिम तारीख काही दिवसांच्या अंतरावर येऊन ठेपली आहे. 31 डिसेंबर पर्यंत आयकर विवरण दाखल करण्याची मुदत आहे. काही तज्ज्ञांच्या मते आयकर विवरण दाखल करण्याची मुदत 10 जानेवारी पर्यंत वाढविली जाण्याची शक्यता आहे. अंतिम तारीख नजीक आली असल्याने UIDAI,GSTN, NSDA आणि बँकाचे सहकार्य घेतले जाते आहे. जेणेकरुन आयकर विवरण दाखल करण्यासाठी कोणत्याही प्रकारे डाउनटाइमची वेळ येऊ नये.
आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अखेरच्या क्षणापर्यंत विवरण भरण्यासंबंधी विचारणा केली जाते. पासवर्ड किंवा रिटर्न फॉर्म संबंधी माहितीच्या अडचणी निर्माण होतात. त्यामुळे वेळेपूर्वीच आयकर विभागाने उपलब्ध करुन दिलेल्या सेवेचा लाभ घ्यावा. सध्या दिवसाला आयकर विवरण भरणा करणाऱ्यांची संख्या दिवसाला 6 लाख आहे. आगामी काळात ही संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे आयकर विवरणसंबंधी शंका असल्यास त्वरित फोन करा आणि थेट संपर्क साधा. कोणत्याही त्रूटीविना आपले आयकर विवरण दाखल करा.
इतर बातम्या :