नवी दिल्ली: देशाचा सुवर्णकाळ पाहिलेले उद्योगपती आणि भारताचे स्टिल मॅन (Steel Man of India) अशी ओळख असणारे ज्येष्ठ उद्योगपती जमशेद जे ईराणी (Jamshed J Irani) यांचं काल सोमवारी निधन झालं. जमशेदपूर (Jamshedpur) येथे त्यांनी अंतिम श्वास घेतला. ते 86 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी डेजी ईराणी, मुलं जुबिन, निलोफर आणि तनाज आदी आहेत. त्यांच्या निधनामुळे उद्योग जगतातील भीष्म पितामह हरवल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
टाटा स्टिलने एक निवेदन जारी करून जमशेद जे ईराणी यांच्या निधनाचं वृत्त दिलं आहे. स्टिल मॅन ऑफ इंडिया यांचं निधन झालं आहे. पद्म विभूषण डॉ. जमशेद जे ईराणी यांच्या निधनाचं वृत्त देताना आम्हाला खूप दु:ख होत आहे. त्यांनी 31 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजता जमशेदपूर येथे शेवटचा श्वास घेतला, असं या निवेदनात म्हटलं आहे. ईराणी हे जून 2011 मध्ये टाटा स्टिलच्या बोर्डातून निवृत्त झाले होते.
परदेशात शिक्षण घेतल्यानंतर जमशेद ईराणी यांनी आपल्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात केली. 1968मध्ये टाटा आयर्न अँड स्टिल कंपनीत सामिल होण्यासाठी ते भारतात आले. आता ही कंपनी टाटा स्टिल या नावाने ओळखली जाते. या कंपनीचे प्रभारी संचालक म्हणून त्यांनी कामास सुरुवात केली होती.
टाटा स्टिल आणि टाटा सन्सशिवाय डॉ. ईराणी यांनी टाटा मोटर्स आणि टाटा टेलिसर्व्हिसेससहीत टाटा समूहाच्या अनेक कंपन्यांमध्ये संचालक म्हणून काम पाहिलं. 1978मध्ये ते टाटा स्टिलचे जनरल सुपरिटेंडेंट बनले. 1979मध्ये जनरल मॅनेजर बनले. 1985मध्ये टाटा स्टिलचे प्रेसिडेंट बनले. 1988मध्ये त्यांनी ज्वॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून पदभार स्वीकारला. 1992मध्ये ते मॅनेजिंग डायरेक्टर बनले. त्यानंतर 2001मध्ये ते कंपनीतून निवृत्त झाले.